करोनाच्या संकटामुळे जगभरातील उद्योगजगतामध्ये मंदीचे वातावरण आहे, असं असूनही ‘टेस्ला’ कंपनीत मात्र गुंतवणूकदार रस दाखवताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकी कंपनी ‘टेस्ला’च्या शेअर्सनी बुधवारी विक्रमी उंची गाठली. यासोबतच टेस्लाने जपानच्या टोयोटा कंपनीला मागे टाकलं आणि जगातील मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी ठरली.

गेल्या सहा महिन्यांमध्येच टेस्लाच्या शेअर्समध्ये तब्बल 90% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे करोना महामारीच्या लॉकडाउनचा फटका बसल्याने कंपनीचा कॅलिफोर्नियामधला मुख्य कारखाना एका महिन्याहून जास्त काळ बंद होता, तरीही गुंतवणूकदारांनी टेस्लावर विश्वास दाखवला आहे. 9 जानेवारी रोजी पहिल्यांदा टेस्लाची शेअर व्हॅल्यू जनरल मोटर्स आणि फोर्ड मोटर कंपनीच्या संयुक्त बाजार मूल्याइतकी झाली. तेव्हापासून मार्च-एप्रिलमधील थोडी घट वगळता कंपनीच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत आहे.

वाढ होण्याचं काय असू शकतं कारण ? :-
टेस्लाने 2019 मध्ये जवळपास 3,70,000 कार विकल्या. ही संख्या टोयोटा, जीएम, फोर्ड, होंडा आणि व्होक्सवॅगन या कंपन्यांच्या तुलनेत बरीच कमी आहे. कारण, यातील एक कंपनी प्रत्येकी 10 दशलक्ष कारची विक्री करते. तर, जगभरात एकूण 90 दशलक्ष कारची सामान्यपणे विक्री होते. पण, गुंतवणूकदार पुढच्या दोन वर्षांनंतरचा विचार करत असावेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढेल आणि टेस्ला इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यात आघाडीवर आहे, त्यामुळे टेस्लाकडे गुंतवणूकदारांचा कल जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.