लोहचुंबकाचं एक वैशिष्ट्य असतं. दोन लोहचुंबक जवळ आणले असता, समान ध्रुव असलेल्या बाजू एकमेकांना विरोध करतात तर विरुद्ध ध्रुव असलेल्या बाजू एकमेकांना चिकटतात. Opposite Poles Attracts , Similar Poles Repel, असं ते तत्व आहे. गंमत म्हणजे काहीसं असंच स्त्री – पुरूषांना लागू होतं. नैसर्गिक रचनेचा भाग म्हणून, सृष्टी वाढण्यासाठी प्रजोत्पादनाच्या मुख्य हेतूसाठी स्त्री – पुरूषांमध्ये परस्पर आकर्षण होणं आवश्यक आहे. हाच हेतू साध्य करण्यासाठी की काय न कळे निसर्गानं स्त्री – पुरुषांना अनेक बाबतीत लोहचुंबकासारखं विरुद्ध ध्रुवाचं किंवा अपोझिट पोल्सचं बनवलंय की काय अशी शंका यावी.
प्रणयाराधनाचा सुरुवातीचा काही काळ वगळता जर जोडप्यांचं सगळ्या गोष्टींवर एकमत होत असेल तर दोनच शिक्के बसतात, एकतर नशीबवान आहे किंवा ‘नाटकी’. कारण स्त्री – पुरूषांचं प्रदीर्घकाळ पटू शकेल, वाद – विवाद होणारच नाहीत ही शक्यताच सहजासहजी कुणाच्या पचनी पडत नाही.
अगदी नेहमीच्या संवादांमध्ये नी प्रसंगांमध्ये ती व तो कसे वेगळे आहेत, हे दिसतं.

विषय सिनेमा बघण्याचा

आता, साधं एखादा सिनेमा बघायचं ठरलं की ती म्हणते चल उद्या जाऊया का?
तो म्हणतो, चार दिवसांनी गेलो तर?
ती म्हणते चार दिवसांत असा काय मोठा फरक पडणारे?
तो म्हणतो… अगं म्हणजे सिनेमा चांगला आहे की नाही ते चारचौघांकडून कळेल, आणि नंतर तिकिटांचे दर पण कमी होतात. थोडं डोकं वापर ना?
‘ती’ला जगात सगळ्यात जास्त कसला राग येत असेल तर डोकं काढल्याचा…
सिनेमाचा मूड आलाय तर लगेच जायचं, मग तिथं हा बाकिचा विचार येतोच कुठे? त्यात पैसे वाचवायचे असतील तर मित्रांबरोबर पार्ट्या झोडायला बरे पैसे असतात… ऑफिसच्या ‘कंपनी’बरोबर पबमध्ये हजारो रुपये ‘फुकट’ जात नाहीत, तर ते सोशल नेटवर्किंग असतं, मात्र माझ्याबरोबर 100 रुपये तिकिटाला जास्त लागले तर ते फुकट गेले…विषय पार भरकटतो आणि सगळं मुसळ केरात…
आता, त्याच्यासाठी विषय सुरू झाल्या झाल्या कमीतकमी पैशात ते ही चांगला असेल तरच सिनेमा बघणं असतं. तर तिच्या मनात छान नटून नवऱ्याबरोबर किंवा प्रियकराबरोबर जायचं, मैत्रिंणींना वेळ नाही, त्याच्याबरोबर जातेय असं उगाच सांगायचं. जेवायला घरी येणार नाही, बाहेरच खाऊ, काय मागवू अशा विचारात रममाण व्हायचं… न झालेल्या कष्टांमधून शीण म्हणून सिनेमा बघायचा असतो त्याच्याबरोबर.

विषय लग्नाच्या नियोजनाचा

अॅरेंज असो वा लव्ह लग्न करायचं एकदा ठरल्यानंतर ते पार पडेपर्यंतचा काळ म्हणजे खरंतर स्त्री – पूरूषांना त्या दोघांमधला फरक ओळखण्यासाठीचा सुवर्णकाळ आहे. गोडीगुलाबी संपलेली असते आणि चोख व्यवहाराला सुरूवात होणार असते…

ती म्हणते चला एकदाचा लाभला मुहूर्त लग्नाचा. ए या रविवारी हॉल बघायला जाऊया का?
तो म्हणतो या रविवारी नको… भारत – ऑस्ट्रेलिया मॅच आहे.
ती म्हणते किती वाजता आहे.
तो म्हणतो दुपारी सुरू होईल अडीच वाजता.
हां मग जाऊ ना सकाळी. दोन – तीन हॉल बघून होतील ना..
ए सॉरीच हं… गाडी सर्विसिंगला टाकायचीय.
अरे ती नंतर टाक ना कधीतरी. आपण जाऊचया हॉल बघायला.
जाऊच या वगैरे नाही हां. गॅरेजमधून मोकळा झालो लवकर तर फोन करतो. किती अर्ध्या तासात होईल ना?
काय अर्धा तास फक्त…. आयुष्यात एकदाच आपण लग्न करणार, त्यालाही तुला वेळ नाही, फक्त अर्धा तास आहे….
तसं नाही गं… विचारलं आपलं. पहिलंच लग्न आहे ना?
दोघंही आपलं नवीन नवीन असल्यामुळे हसण्यावारी नेतात… पण संवादाची गाडी कशी जाणारे याची दिशा मात्र निश्चित असते…

मग कपडे खरेदी असो, कुणाकडे समारंभांना जायचं असो वा अगदी मुलांना कुठल्या शाळेत घालायचं हे ठरवायचं असो… जसे जसे संबंध जुने होत जातात तशी तशी शस्त्रांना धार आलेली असते, अनुभवानं नाजूक जागा माहित झालेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, वाद-विवादापलीकडे हे फार जाणार नाही याचीही कुठेतरी खात्री पटलेली असते.
एक रविवार मिळतो तर जरा टी-शर्ट जीन मध्ये जावं असं त्याचं मत, तर कितीही उकडत असलं तरी सिल्कची साडी नेसल्यामुळे तिला मॅचिंग कुर्ता पायजमा घालावा हा तिचा हट्ट…
आमची आख्खी पिढी मराठीत शिकली नी सध्या अमेरिकेत आयटीमध्ये आहे, काय अडलंय असं एकाचं मत… तर काळ बदललाय असं दुसऱ्याचं.
अरे उशीर का झाला? आई आली होती… या प्रश्नाला रेल्वे मी नाही चालवत हे उत्तर…
तुम्ही अर्ध्या तासापूर्वी भेटलेल्या मैत्रिणीशी फोनवर इतकं काय बोलता? या प्रश्नाला तुझ्या आईशीही मीच बोलते, तू नाही हे उत्तर…
उद्या सुट्टी घे ना, मला बरं वाटत नाहीये. डॉक्टरकडे जाऊया.. यावर काम कोण माझे पिताश्री करतील का? हा प्रश्न… यावर सिमला कुलू मनालीला 10 दिवस गेलो असताना कुणी केलं? हा प्रतिप्रश्न…

हा प्रश्नोत्तरांचा खेळ कधीही न संपणारा आहे. कारण क्रिकेट खेळत असलेल्या एका माणसाशी दुसरा बुद्धीबळ खेळायला लागला तर खेळ कसा होणार… जे काय होईल त्याला खेळखंडोबाच म्हणावं लागेल..

पण हे निरंतर सगळ्या समाजांमध्ये थोडाफार चालीरीतींचा फरक वगळता चालत आलेलं आहे. आता हे असं का होतं? बरं होतं ते होतं… सगळ्यांचं असंच का होतं? थोडेफार तपशील वगळता, ती व तो मधला फरक सगळीकडे असाच का दिसतो?

मानसशास्त्रज्ञांच्या मते याला म्हणे शास्त्रीय कारण आहे. माणूस हा सगळ्यात प्रगल्भ आहे म्हणजे काय तर माणसाचा मेंदू सर्वाधिक विकसित आहे. त्यातही फक्त माणसामध्ये फ्रंटल लोब म्हटला जाणारा म्हणजे पुढचा मेंदू आहे. बाकी सगळ्या प्राण्यांच्या माणसांच्या सामाईक शारीरिक क्रियांचं नियंत्रण मागच्या मेंदूनंच होतं. मात्र, पुढचा मेंदू विचार करणं, भावभावनांवर नियंत्रण मिळवणं, निर्णय घेणं अशा अनेक गोष्टी करतो. आणि या फ्रंटल लोबमध्ये दोन प्रकार असतात, डावा मेंदू नी उजवा मेंदू. शास्त्रज्ञांना असं आढळलंय की स्त्रियांचा डावा मेंदू प्रभावी असतो तर पुरूषांचा उजवा. यातली मेख अशी आहे की डावा मेंदू भावनाप्रधान असतो, त्याला आकडेवारी, व्यावहारिक चातुर्य, बारीकसारीक गणितीय आकडेमोड अशा गोष्टी जमत नाही, ते उजव्या मेंदूचं काम. तर उजव्या मेंदूला सहज वाटलं म्हणून, उगाचंच, काहीतरी अशा शब्दांचं आणि शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या अमूर्ताचं वाकडं असतं.
परिणामी डाव्या मेंदूचा जास्त वापर करणाऱ्या स्त्रिया भावनेचा, कुणाला काय वाटेल याचा, स्वभावाचा, परस्पर संबंधांचा, काळजी घेण्याचा, सेवा करण्याचा विचार करतात. वैद्यकीय सेवेसारख्या क्षेत्रामध्ये डॉक्टर्समध्ये पुरूषांची संख्या जास्त असली तरी सुश्रूषा करणाऱ्या नर्स असाव्यात हा योगायोग नसावा.
तर दुसऱ्या बाजुनं उजव्या मेंदूचा पगडा असलेल्या पुरूषांना चोख व्यवहारी असण्याची नैसर्गिक वृत्ती लाभलेली असते. तिच्या स्वभावापेक्षा शरीराची वळणं जास्त महत्त्वाची वाटतात. भावभावनांपेक्षा ‘काम’ महत्त्वाचं वाटतं. उगाच नातेसंबंधांतील गुंतागुंतीची उगाळणी करत बसण्यापेक्षा, झालं गेलं विसरून मूव्ह ऑन प्रकाराकडे पुरूषांचा जास्त ओढा असतो. त्यामुळे जे झालं ते झालं आता ते विसरून जाऊ आणि उद्याचा विचार करू या ‘त्या’च्या प्रस्तावावर ‘ती’चं स्वाभाविक उत्तर असं कसं विसरणार? हे असतं. त्याचा उजवा मेंदू सतत व्यवहारी जगात फटाफट तोडगे काढण्याचा विचार करत असतो, तर भावनाविश्वात अडकलेली ती ते अमुक अमुक असं असतं तर किती छान झालं असतं या विचारात गुरफटलेली असते.
हा सगळा स्त्रियांच्या व पुरूषांच्या आचारा विचारांमधला फरक काही मानसशास्त्रज्ञांच्या मेंदूतल्या या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेचा भाग आहे. मग यावर मार्ग काय? मार्ग एकच, उगाच दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करू नका. आता निसर्गानं वायरिंगचं तसं केलंय तर ते आपण कसं बदलणार? तर एकमेकांमधले फरक लक्षात घ्या. हा फरक एकमेकांना पूरक कसा ठरू शकेल याचा विचार करून जर दोघांनीही तो मनोमन स्वीकारला आणि त्याचा आदर केला तर आणि तरच प्रेमाचे कोंब फुटायची शक्यता असते. अन्यथा… निसर्गानं त्याची सृष्टीवाढीची गरज म्हणून निर्माण केलेल्या सेक्सचं नाविन्य संपलं की रोजचं आहेच…

तूझ्याशी बोलून काही फायदा नाही
आणि…
मी तुला काय बोलत्येय ते आयुष्यात समजायचं नाही!