– डॉ. भारत अग्रवाल

थंडीच्या मोसमाकडून हळूहळू वसंत ऋतूकडे व उन्हाळ्याकडे बदलणारा हंगाम आरोग्याच्या दृष्टीने काहीसा नाजूक असतो. या काळात शरीर वेगवेगळ्या तापमानाशी व आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. प्रतिकारक्षमता उत्तम असलेल्या व्यक्ती फारसा त्रास न होता हंगामातील बदल सहन करू शकतात, परंतु मानवाच्या शरीरातील व्यवस्था कमकुवत झाली आहे आणि विविध घटकांमुळे बाह्य घटकांचा परिणाम त्यावर लवकर होतो. आज, भरपूर व्यायाम व चांगला आहार याद्वारे शरीर सक्षम करण्यासाठी पुरेसा वेळ देणे लोकांना शक्य होत नाही. ताण वाढत असल्याने बदलत्या हंगामाबरोबर निर्माण आजारांना लोक सहज बळी पडतात. उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर असताना आनंदी व निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पुढे दिल्या आहेत –

हलका आहार, पाण्याचा अंश अधिक असणारी फळे व भाज्या यांचा आहार घ्यावा

हिवाळ्याच्या मोसमात कार्बोहायड्रेट अधिक खाणे व फॅट अधिक असणारे पदार्थ खाणे यास हरकत नाही. यामुळे थंड हवेमध्ये थोडी ऊब मिळण्यासाठीही मदत होते. परंतु, उन्हाळ्याच्या काळात ओलावा राखणे गरजेचे आहे. उष्मा सुरू होत असल्याने शरीरात ओलावा राखण्यासाठी पाण्याचा अंश अधिक असणारी फळे व भाज्या खाणे उपयुक्त ठरते. शरीरात पुरेसे पाण्याचे प्रमाण नसेल तर त्वचा कोरडी पडते आणि केस गळू लागतात. कोरडी त्वचा व कोरडे केस यासाठी अनेकदा लोक बाहेरून उपचार करताना दिसतात, पण आहाराकडे योग्य लक्ष दिल्यास यातील अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात.

व्यायामाचे वेळापत्रक बदलणे

वर्षभर व्यायाम करणे गरजेचे आहे. परंतु, वसंत ऋतू व उन्हाळा हा कालावधी व्यायामाच्या दृष्टीने सर्वात अनुकूल असतो. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हाळ्यात बाहेर व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. निसर्गाच्या सहवासाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, नेचर वॉक, ट्रेकिंग, बायकिंग, गिर्यारोहण अशा उपक्रमांसाठीही उन्हाळा अधिक आदर्श असतो. उन्हाळ्यामध्ये अधिक तीव्रतेचे व्यायाम करता येऊ शकतात. परंतु, योग्य प्रमाणात ओलावा राखणे व पोषण राखणे गरजेचे आहे – उच्च तीव्रतेच्या व्यायामाच्या बाबतीत एनर्जी ड्रिंक व प्रोटिन बार उपयुक्त ठरतात.

अॅलर्जी व सर्दी

कोणताही हंगाम बदलत असताना लोकांना सर्रास होणारे आजार म्हणजे सर्दी, घसा धरणे किंवा अॅलर्जी होणे. संत्री, लिंबू, द्राक्षे, किवी अशी व्हिटॅमिन सी असणारी फळे आणि पालक, ब्रोकोली अशा पालेभाज्या खाल्यास सर्दीला दूर ठेवता येऊ शकते. अॅलर्जी नियंत्रित करण्यासाठी अॅलर्जी होण्यासाठीची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. एक तर अॅलर्जी करणारे घटक टाळावेत (जसे धूळ किंवा विशिष्ट पाने) व त्याबरोबरच अॅलर्जीची हल्ला नियंत्रित करण्यासाठी सज्ज राहावे.

झोप

तापमान थोडे वाढल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. शरीराचे घड्याळ विस्कटू नये आणि व्यक्तीच्या झोपेवर परिणाम होऊ नये म्हणून शांत झोप लागण्याच्या हेतूने घरामध्ये योग्य तापमान राखावे. रात्री कपभर गरम दूध घेतल्यास झोप लागण्यासाठी मदत होईल. उन्हाळ्याच्या काळात रात्रीचे जेवण हलके घ्यावे आणि मध्यरात्री खाणे टाळावे.

(लेखक अपोलो हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहेत)