भारतात आयफोनचं उत्पादन करणारी तैवानची कंपनी ‘विस्ट्रॉन’च्या कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील कारखान्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. तेव्हापासून कारखान्यातून आयफोनचं उत्पादन बंद होतं, पण आता कंपनी लवकरच उत्पादन घेण्यास सुरूवात करणार आहे.

विस्ट्रॉनच्या सीईओंनी ९ फेब्रुवारी रोजीच कारखान्यातील उत्पादन पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरूवारी विस्ट्रॉनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कर्नाटकचे उद्योग मंत्री जगदीश शेट्टार यांची भेट घेतली आणि उत्पादन पुन्हा सुरू करत असल्याची माहिती दिली. यावेळी, राज्य सरकारकडून कंपनीला सहकार्य केलं जाईल असं सांगत शेट्टार यांनी विस्ट्रॉनचं कामकाज लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी शेट्टार यांनी याबाबत माहिती दिली.

काय घडलं होतं?:- 
१२ डिसेंबर रोजी कोलार जिल्ह्यातील नरसापूर येथील विस्ट्रॉन कार्पोरेशनच्या कारखान्यात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन न मिळाल्यामुळे संतापलेल्या जवळपास चार हजार कामगारांनी ही तोडफोड केली होती. त्यानंतर विस्ट्रॉन कंपनीने कर्मचाऱ्यांचं वेतन थकवल्या बद्दल माफी मागितली असून कंपनीच्या भारतातील उपाध्यक्षांचीही हकालपट्टी केली होती. तर, बंगळुरूतील या घटनेनंतर Apple नं देखील विस्टॉनला झटका देत कंपनीला प्रोबेशनवर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत विस्ट्रॉन ही कंपनी आपल्या चुका पूर्णपणे सुधारत नाही तोवर कंपनीला कोणताही व्यवसाय न देण्याचा निर्णय Apple नं घेतला होता. तसेच, हिंसाचाराच्या घटनेसाठी अ‍ॅपलनेही माफी मागितली होती. शिवाय कर्नाटक सरकारनेही हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.