आपल्या कुटुंबाबरोबर मुंबईत राहणा-या संघमित्राने दागिन्यांची विक्रेती म्हणून १० वर्षे काम केले. या सगळ्या काळामध्ये स्वत:चा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न तिने कायम उराशी जपले होते. मण्यांच्या तोरणांसारख्या सजावटीच्या वस्तू बनविणे हा तिचा छंदच होता. पण या छंदाकडे करिअरची संधी म्हणून पाहण्याचा विचार तिने कधीच केला नव्हता. चार पैसे गाठीशी बांधता यावेत म्हणून आपल्या लहानशा घरामध्ये पापड बनवून विकण्याची खटपट करताना आपल्या कुटुंबाचे जीवनमान आणखी उंचावण्यासाठी आणखी काय करता येईल याचा विचार ती करू लागली. त्यासाठी तिने मुंबईजवळच्या गावातील अल्पबचत गटांनी बनविलेले पापड विकण्यासाठी घेऊन वांद्र्याच्या स्थानिक बाजारात छोटासा स्टॉल मांडण्याचे ठरवले. पण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नाहीत हे तिच्या लवकरच लक्षात आले. स्वत:चा उद्योग सुरु करण्याची तिची जिद्द आणि उत्साह पाहून तिच्या परिसरातल्या काही महिलांनी तिला महिला आर्थिक विकास महामंडळाशी (MAVIM) संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

महिला सबलीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून आयोजित केल्या जाणा-या निरनिराळ्या प्रशिक्षण सत्रे आणि प्रदर्शनांची माहिती संघमित्राला मिळाली. तिने महामंडळाच्या मदतीने आपल्यालाही काही फायदेशीर व्यवसाय उभारता येईल का, हे आजमावून पहायचे ठरवले. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची संधी देणारे व्यासपीठ या माध्यमातून संघमित्राला मिळाले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संपर्कात आल्यानंतरच्या तीन-साडेतीन वर्षांच्या कालावधीत मण्यांची तोरणे आणि पापड विकण्याचा आपला छोटासा व्यवसाय उभारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या व्यवसायाला देशभरात पोहचवण्यासाठी संघमित्राचे नंतर अॅमेझॉन इंडियाच्या सहेली कार्यक्रमांतर्गत आपली उत्पादने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. उद्योग उभारणीच्या प्रयत्नांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाने दिलेली साथ हा तिच्या आयुष्याला खरीखुरी कलाटणी देणारा टप्पा ठरला. कारण याच व्यासपीठाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अनेक प्रदर्शनांमध्ये सहभाग घेता घेताच तिच्या व्यवसायाची पायाभरणी झाली व तो वाढण्यास मदत झाली.

आपल्या या लघू उद्योगाबद्दल बोलताना संघमित्रा सांगते, ”मला आणि माझ्यासारख्या इतर अनेक महिला उद्योजकांना महिला आर्थिक विकास महामंडळ आता अॅमेझॉन इंडियाच्या सहेली कार्यक्रमांतर्गत आपली उत्पादने देशभरात पोहोचवण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे. ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून देशभरातील लक्षावधी ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने व्यवसाय विस्तारण्याचा हा नक्कीच एक चांगला मार्ग आहे. आपल्या पायावर उभे राहणे म्हणजे नेमके काय याचा शब्दश: अनुभव मी घेत आहे. स्वयंसिद्ध बनणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय होते आणि माझे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मला मदत करणा-या सर्व महिलांची मी आभारी आहे. आता आपणही एक उद्योजिका आहोत, असे मला वाटते. आत्तापर्यंतचा माझा प्रवास खडतर असला तरी समाधान देणारा होता. आता हा उद्योग मला देशभरात पोहोचवायचा आहे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच अॅमेझॉन इंडियाच्या सहेली कार्यक्रमाच्या पाठबळाने मला माझे लक्ष्य नक्कीच गाठता येईल, याची मला खात्री वाटते.”

वस्तूच्या विक्री आणि खरेदीसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अॅमेझॉन इंडियाने नोव्हेंबर २०१७ मध्ये ‘अॅमेझॉन सहेली’ या एका नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला. देशभरातील महिला उद्योजकांना आपली उत्पादने अॅमेझॉन इंडियाच्या बाजारपेठेत विकता यावीत हा या उपक्रमामागचा हेतू आहे. अॅमेझॉन सहेलीच्या माध्यमातून महिला उद्योजकांना कधी नव्हे इतक्या मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचता येते. आपला व्यवसाय विस्तारासाठी अॅमेझॉन जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स व फुलफिलमेंट सुविधांचे पाठबळही या महिलांना देते. महिला उद्योजकांना रेफरल फीजमध्ये सबसिडी, मोफत इमेजिंग आणि कॅटलॉगिंग, हिशेबांचे व्यवस्थापन तसेच आपले उत्पादन बाजारपेठेत दाखल केल्यानंतर आवश्यक ती सगळी मदत, खास स्टोअरफ्रंट्सच्या माध्यमातून त्यांची उत्पादने ग्राहकांच्या सहज नजरेत यावीत व उठून दिसावीत यासाठीची मदत असे अनेकानेक फायदेही मिळतात. २०१७ साली केवळ २ भागीदार संघटनांच्या साथीने सुरू झालेला हा प्रकल्प वर्षभरातच विस्तारला आहे आणि आज देशभरातील १८ संघटना या प्रयत्नांमध्ये सामील झाल्या आहेत. आज या माध्यमातून अॅमेझॉन इंडिया हजारो महिला उद्योजकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणताना दिसत आहे.