दागिने किंवा अलंकार हे स्त्रीवर्गाच्या सर्वात जिव्हाळय़ाचे विषय. त्यातही भारतीय स्त्रियांना दागिन्यांचे भारी आकर्षण असते. कोणताही सणसोहळा असो, त्यासाठी प्रत्येकीकडे वेगवेगळे दागिने असतातच. आता येत्या काळात सुरू होत असलेला गणेशोत्सव आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेले नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण म्हणजे असे दागिने मिरवण्याची पर्वणी. पण दागिने म्हणजे केवळ सोन्याचांदीचे किंवा मौल्यवान हिऱ्यांचेच असतात असे नाही. अलीकडच्या काळात तर वेगवेगळय़ा धातूंचे आणि मण्या-खडय़ांचे दागिने उपलब्ध असतात. शिवाय त्यामध्ये वैविध्यही आले आहे. सणासुदीला पारंपरिक दागिने स्त्रीचे सौंदर्य खुलवत असले तरी असे दागिने इतर वेळी किंवा कार्यालयात, कॉलेजात जाताना वापर करता येत नाही. त्यामुळेच सध्या बाजारात फ्युजन दागिन्यांची चलती आहे. असे दागिने सणासुदीसोबत एरवी साध्या समारंभांनाही वापरण्याजोगे असतात.

भारतात दागिन्यांचे असंख्य प्रकार आहेत. अगदी प्रांतागणिक यात मोटीफ, स्टाईल यांची विविधता येते. त्यात इमिटेशन ज्वेलरीचा पर्याय आल्यामुळे हे दागिने वापरायला सोयीचे ठरतात. सणांच्या मोसमात या पारंपरिक दागिन्यांना अधिक मागणी असते. पण एकदा हा मोसम ओसरला की मात्र हे दागिने कपाटात पडून राहतात. दागिने इमिटेशनचे असले तरी ते वजनाने जड असतात. नेहमीच्या जीन्स, टी-शर्ट अशा वेस्टर्न लूकला साजेसे दिसतीलच, असे नाही. या सगळ्याचा विचार करून यंदा बाजारात फ्युजन दागिन्यांची रेलचेल सुरू झाली आहे. हे दागिने सुटसुटीत, हलके असतात आणि कोणत्याही लूकवर सहज जुळून येतात. त्यामुळे अगदी रोजही सहज वापरू शकता.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

क्रिस्टल ज्वेलरी

पारदर्शी, वेगवेगळ्या रंगांची फिकट छटा असलेले, कधी छान आकार असलेले तर कधी काहीसे ओबडधोबड क्रिस्टल पहिल्या नजरेतच लक्ष वेधून घेतात. हेच क्रिस्टल सध्या दागिन्यांमध्ये सामील झाले आहेत. याआधी बारीक, नाजूक क्रिस्टलच्या माळा ज्वेलरकडे पाहायला मिळायच्या. पण सध्या काहीशा मोठय़ा आकाराचे क्रिस्टलचे इमिटेशन दागिने बाजारात आले आहेत. त्यात पेंडेंट, ब्रेसलेट, नेकपीस, इअररिंग्स, अंगठय़ा असे प्रकार प्रामुख्याने दिसतात. सणांच्या दिवसात एखादा नेकपीस ड्रेस किंवा साडीवर नक्कीच घालू शकता. एरवीच्या गोल्ड, सिल्व्हर ज्वेलरीपेक्षा याचा लूक वेगळा दिसेल.

गेरू फिनिश

अँटिक ज्वेलरी सध्या तरुणींची लाडकी आहेच. काहीशी काळसर छटा असलेली, कुंदन, खडय़ांचा वापर केलेल्या अँटिक ज्वेलरीला सणांच्या सिझनमध्ये विशेष मागणी असते. यंदा यामध्ये गेरू फिनिश असलेली ज्वेलरी भाव खात आहे. या ज्वेलरीमध्ये दागिन्यांना सोन्याचा मुलामा देताना लालसर छटा दिली जाते. हा रंग गेरूच्या रंगाप्रमाणे गडद लाल असतो. त्यामुळे गेरू फिनिश ज्वेलरी म्हणतात. यात खास टेम्पल ज्वेलरी डिझाइन सध्या ट्रेंडमध्ये आहेत. यात इमिटेशन ज्वेलरी तर आहेत, पण एक ग्राम सोन्याचे दागिनेही उपलब्ध आहेत. नेकपीस, बांगडय़ा, कानातले डूल, मंगळसूत्र पेंडेंट असे पारंपरिक प्रकार यात पाहायला मिळतात.

हटके स्टाइल्स

नेहमीचे नेकपीस, बांगडय़ा यांना रजा देत काही वेगळ्या धाटणीचे दागिनेही बाजारात आले आहेत. मुख्य म्हणजे यांची प्रेरणा पारंपरिक दागिन्यांमधून घेण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि वेस्टर्न लूकसोबत हे दागिने सहज जुळून येतात. कॉकटेल रिंग्स हा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहेच. हातात एकच मोठाली खडय़ाची अंगठी घातली की इतर बांगडय़ा, कडे यांची गरज नसते. याचबरोबर सध्या कॉकटेल इअररिंग्ससुद्धा बाजारात आले आहेत. लांब आकाराचे हे कानातले लगेच नजरेत भरतात आणि यांच्यासोबत नेकपीस, पेंडेंटची गरजही नसते. हातफूल हाही यातलाच एक प्रकार. कडं आणि अंगठी यांना जोडून बनणारं हातफूल पारंपरिक दागिन्यांचा प्रकार असला तरी फ्युजन ज्वेलरीचा एक भाग बनलं आहे. तसचं सध्या अँटिक फिनिशचे बाजुबंद बाजारात आले आहेत. यांची डिझाइन्स मॉडर्न आणि वेस्टर्न लूकला साजेशी आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या लुक्सवर सहज वापरता येतात.

कुठे मिळतील?

दादर, परळ, क्रॉफर्ड मार्केट, कुलाबा कॉजवे, मालाड, बोरिवली, गोरेगाव मार्केट अशा खास ठेवणीतले दागिने मिळणाऱ्या मार्केटमध्ये हे दागिने तुम्हाला सहज मिळतील. त्यांच्या किमती साधारणपणे १०० रुपयांपासून सुरू होऊन ७०० रुपयांच्या घरात जातात.