– डॉ. स्नेहिल मिश्रा

हृदयविकार बहुतांश वेळेस पुरुषांनाच होतो असे समजले जाते. मात्र, काही काळापूर्वी स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर मीडियाने स्त्रियांना होणाऱ्या हृदयविकाराकडे आपले लक्ष वळवले आणि त्यांच्या मृत्यूचे कारण वेगळे असल्याचा दावा पुढे आल्यानंतर या समस्येवरील लक्ष परत एकदा हटवले गेले. कित्येक स्त्रियांना कर्करोगाचा जास्त धोका वाटतो, मात्र ही त्यांची चूक आहे. कार्डिओव्हस्क्युलर आजारामुळे मरण पावणाऱ्या स्त्रियांची संख्या स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांपेक्षा सहा पटींनी जास्त असून स्त्रियांच्या मृत्यूमागच्या कारणामध्ये हे पहिल्या क्रमांकाचे कारण आहे. स्त्रियांमध्ये हृदयविकारासंदर्भात असणारे काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो.

गैरसमज १ – स्त्रिया हृदयविकारापासून सुरक्षित असतात.
मेनोपॉज येईपर्यंत स्त्रियांना हृदयविकाराचा धोका तुलनेने कमी असतो हे खरे असले, तरी हे संरक्षण पुरेसे नसते. इतर ठराविक लक्षणे उदा – वाढलेले वय, मधुमेह, असंतुलित कोल्सेट्रॉल, स्थूलत्व यामुळे स्त्रियांवर परिणाम होतो. या कारणांमुळे स्त्रियांमध्ये हृदयविकार विकसित होण्याची पुरुषांपेक्षा जास्त शक्यता असते. त्याशिवाय काही धोके केवळ स्त्रियांनाच असतात किंवा स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतात. यामध्ये गरोदरपणाशी संबंधित हायपरटेन्शन आणि मधुमेह, ओसी गोळ्यांचा वापर, ऑटोइम्युन विकार, मानसिक पैलू इत्यादींचा समावेश होतो.

गैरसमज २ – हृदयविकाराचे सर्व प्रकार पुरुषांमध्ये जास्त दिसून येतात.
हृदयविकाराचे सर्व प्रकार स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतात. यामध्ये कोरोनरीजच्या लहान रक्तवाहिनीचा आजार, ब्रोकन हार्ट सिंड्रोम, कोरोनरी डिसेक्शन इत्यादींचा समावेश होतो. या सर्व आजारांमुळे आयुष्याचा दर्जा कमी होण्याचा तसेच मृत्यूचा धोका असतो.

गैरसमज ३ – तरुण स्त्रियांना काळजी करण्याची गरज नाही
धमन्यांमध्ये फॅट्सचा साठा तयार होण्यास वयाच्या अगदी दुसऱ्या वर्षापासून सुरुवात होते. त्यामुळेच मुलींमध्ये लहान वयापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शारीरिक फिटनेसवर भर दिला गेला पाहिजे. किशोरवयीन मुलींना याचा जास्त धोका असतो, कारण याच वयामध्ये धूम्रपान सुरू होण्याची, ओसी गोळ्यांचा वापर करण्याची शक्यता असते. याच वयात कुपोषण सुरू होत असते. गर्भधारणा होण्याच्या वयातल्या स्त्रियांमध्ये तणाव जास्त असू शकतो, कारण त्यांना कुटुंब आणि करियर अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधायचा असतो तसेच गरोदरपणाशी संबंधित समस्यांनाही तोंड द्यायचे असते.

गैरसमज ४ – स्त्री व पुरुषांमध्ये हृदयविकार सारखाच असतो.
स्त्रियांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छातीत दुखतेच असे नाही. धाप लागणे, थकवा, पचन आणि इतर ठळक नसलेली लक्षणे त्यांच्यात दिसून येऊ शकतात. शिवाय, जेव्हा स्त्रियांना हृदयविकार होतो तेव्हा तो पुरुषांपेक्षा जास्त तीव्र असतो. त्याशिवाय स्त्रियांमध्ये बायपास शस्त्रक्रिया आणि अँजिओप्लॅस्टीनंतर जास्त गुंतागुंत होण्याची शक्यता असते.

गैरसमज ५ – हृदयाच्या वैद्यकीय काळजीमध्ये लिंगसमानता दिसून येते.
स्त्रियांना बहुतेक वेळेस औषधांचे अपुरे डोस दिले जातात आणि त्यांना कार्डिअक पुनर्वसनाचा सल्ला दिला जात नाही. त्यांच्या तक्रारी विशेष उठून दिसणाऱ्यासारख्या नसल्यामुळे त्यांना बहुतेकवेळेस कोरोनरी अनजिओग्राम्सचा सल्ला दिला जातो आणि गरज पडल्यास शस्त्रक्रिया सुचवली जाते.

यावर उपाययोजना काय?
जागरूकता महत्त्वाची.
पुरुषांप्रमाणे तरुण स्त्रियांमध्ये शारीरीक फिटनेस महत्त्वाचा असतो.
पुरुष असो किंवा स्त्री धोक्याच्या पैलूंचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक असते.
अँजिओग्राफी, अँजिओप्लॅस्टी आणि बायपास शस्त्रक्रिया तसेच कार्डिअक पुनर्वसन सुचवल्यास त्याची पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही मदत होते आणि म्हणूनच त्यांना ही मदत नाकारू नये.

(लेखक हिंदुजा हेल्थकेयर रूग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत.)