दर आठवडय़ात किमान ४० मिनिटे वेगवान चालण्यामुळे स्त्रियांमधील हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

स्त्रिया चालण्याव्यतिरिक्त अन्य व्यायाम करत असतील तर शरीराचे वजन आणि व्यायामाचा प्रकार यानुसार फायदे होत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. जगभरातील ६.५ कोटी नागरिकांना हृदयविकाराचा त्रास आहे. या परिस्थितीत हृदय अतिशय कमकुवत होते. त्यामुळे शरीराला आवश्यक रक्तपुरवठा होण्यात अडचणी येतात.

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातील सॉमवेल रास्ला यांनी हे संशोधन केले आहे. शारीरिक हालचालीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचे आम्हाला ठाऊक होते. मात्र त्याच वेळी केवळ चालणे हा पुरेसा व्यायाम ठरू शकत नाही, असेही रास्ला म्हणाले. आमच्या संशोधनानुसार चालणे हा केवळ सहजशक्य व्यायाम नाही तर इतर सर्व प्रकारच्या व्यायामप्रकारांना हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असेही ते म्हणाले. चालण्याच्या माध्यमातून आपण इतर व्यायामाद्वारे मिळवू शकतो तितकीच ऊर्जा मिळवू शकतो. चालण्याच्या व्यायामासाठी इतर कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता भासत नाही आणि शरीरही तंदुरुस्त राहते. त्यामुळेच महिलांनी चालण्याच्या व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात करावी किंवा चालण्याचा व्यायाम सुरू करावा, असेही संशोधकांनी सांगितले. या संशोधनासाठी दहा वर्षांच्या काळातील ८९ हजार महिलांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला आहे. ५० वर्षांपुढील महिलांना हृदयरोगाचा धोका कितपत आहे, या दृष्टीने संशोधकांनी अभ्यास सुरू केला होता.