मोबाइलवरून ‘एसएमएम’ आणि ‘ई-मेल’ पाठवण्यात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर असल्याचे एका नव्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. नातेसंबंध तयार करणे आणि ते अधिक दृढ कसे राहतील याची विशेष काळजी घेण्यात महिलांचा अधिक पुढाकार असतो. यासाठी त्यांना मोबाइल हे माध्यम अधिक सोयीस्कर वाटते, असेही यात नमूद करण्यात आले आहे. याउलट पुरुष मोबाइलचा वापर मनोरंजन आणि सोशल नेटवर्किंगसाठी करतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेतील एका अभ्यास गटाने हे निष्कर्ष नोंदवले आहेत. महाविद्यालयीन तरुणी अथवा महिला मोबाइलवर दिवसाचे दहा तास घालवतात, तर पुरुष आठ तास खर्च करीत असतात. हे सारे नातेसंबंध आणि मनोरंजनासाठी योग्य असले तरी त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमावर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. तासन्तास मोबाइलचा वापर हा घातकच म्हणावा लागेल. विद्यार्थी अभ्यास सोडून हे सारे करत बसतात. याचा अर्थ ते भविष्यातील जीवनाचा फार गांभीर्याने विचार करत असावेत, असे वाटत नाही, असे मत बेलर विद्यापीठाच्या एका संशोधकाने व्यक्त केले आहे. हंकामेर स्कूल बिझनेसचे प्राध्यापक जेम्स रॉबर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी १६४ महाविद्यालयांतील ६० टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्यासाठी मोबाइल हे व्यसन म्हणून जडल्याचे म्हटले आहे. या विद्यार्थ्यांनी मोबाइलवर केलेल्या २४ वापरांचा अभ्यास करण्यात आला. यात ११ वापरांवर खर्च केलेला वेळ वेगवेगळा होता. यात ‘इन्स्टाग्राम’ या अ‍ॅल्पिकेशनवर विद्यार्थी अधिक काळ आढळून आले.