रात्रपाळी करणाऱ्या महिलांना स्तन, त्वचा व पोटाच्या कर्करोगाची शक्यता अधिक असते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

जगात अनेक महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होत असते. त्यांना होणाऱ्या कर्करोगाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यात रात्रपाळी करणाऱ्या महिलांमध्ये कर्करोगाची शक्यता जास्त दिसून आली, पण अजून हे संशोधन परिपूर्ण नाही. चीनमधील शिचुआन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी आधीच्या एका अभ्यासावर आधारित असे हे संशोधन केले असून त्यात दीर्घकाळ रात्रपाळी करणाऱ्या महिलांना होणाऱ्या कर्करोगाचा अभ्यास केला आहे. त्यात १२ प्रकारचे कर्करोग या महिलांना होत असल्याचे दिसून आले आहे.

मेटाअ‍ॅनॅलिसिस पद्धतीने यात उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व आशिया या देशातील ३९,०९,१५२ महिलांच्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आले. यातील ११,४२,६२८ महिलांना कर्करोग झालेला होता. विशेष करून परिचारिका रात्रपाळी जास्त काळ करीत असतात त्यांच्यात सहा प्रकारचे कर्करोग दिसून आले आहेत.

रात्रपाळीमुळे कर्करोगाची जोखीम १९ टक्क्यांनी वाढते असे दिसून आले आहे. त्वचा (४१ टक्के), स्तन (३२ टक्के), आतडे (१८ टक्के) याप्रमाणे रात्रपाळी करणाऱ्या महिलांमध्ये ती न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत कर्करोगाची जोखीम वाढत जाते. उत्तर अमेरिका व युरोपात अनेक महिलांमध्ये रात्रपाळी व स्तनाच्या कर्करोगाचा संबंध दिसून आला आहे, असे शिचुआन विद्यापीठाचे झुलेई मा यांनी सांगितले.

परिचारिकांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची जोखीम ५८ टक्के, आतडय़ाच्या कर्करोगाची जोखीम ३५ टक्के, फुप्फुसाच्या कर्करोगाची जोखीम २८ टक्के वाढते. जर्नल कॅन्सर एपिडिमिऑलॉजी, बायोमार्कर्स अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

सतत पाच वर्षे रात्रपाळी केल्याने स्तनाच्या कर्करोगाची जोखीम ३.३ टक्क्यांनी वाढत असते असेही दिसून आले.