22 August 2019

News Flash

Women’s Day 2018 : त्या सामान्यच पण…

कथा कॉमनवूमनची

देशभर महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिलांचं आज कौतुक होत आहे. मात्र हातातोंडाची लढाई लढत असलेल्या अनेक महिला दैनंदिन जीवनातच आपलं कर्तृत्व सिद्ध करत असतात. त्यांना विशेष ओळख नसते, दररोजच्या सवयीचं असलेलं त्यांच्या कामाची दखल घ्यावी याचीही अनेकदा गरज वाटत नाही. मात्र अनेक पातळ्यांवरील जबाबदाऱ्या सांभाळत, शिक्षणाचा अभाव असताना या महिलांनी केलेलं काम घर उभं करतं. बाकीच्यांसाठी ते विशेष नसेल पण कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी या महिलांसाठी ते अतिशय महत्त्वाचे असते. या ‘कॉमनवूमन’चा रोजचा संघर्ष जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न…

आज जगभरातील अनेक ठिकाणी एसी कार्यालयांमध्ये महिला हक्काची धोरणं मांडली जात होती. कुठे ‘स्त्री’ कर्तृत्वाचा सन्मान होत होता. त्यामध्ये औरंगाबादच्या सिडको बसस्थानाबाहेर मुक्ता कुबेर रामफळाची टोपली घेऊन बसल्या होत्या. संसाराला हातभार लागावा यासाठी शेतातील रामफळ विकून चार पैसे मिळतील म्हणून त्या सूर्याला डोक्यावर घेऊन बसल्या होत्या. मुक्ताबाई म्हणतात, घरची परिस्थिती आणि इतर गोष्टींमुळे शाळेशी ओळखच झाली नाही. पण तरीही संसाराच्या हिशोबाची जुळवाजुळव व्हावी म्हणून तालुक्याच्या गावाला येऊन त्यांची धडपड सुरु असते. महिला सक्षमीकरण, महिला दिन याबाबत आपल्याला काही माहित नाही असं त्या अगदी सहज सांगून जातात. पण घरात बसून पोटाचा प्रश्न थोडीच सुटणार आहे हे त्यांचं वाक्य महिलांच्या परिस्थितीची जाणिव करुन दिल्याशिवाय राहत नाही.

दळण करणे हे महिलेचं काम, पण नेहमीच्या वाटणाऱ्या या कामातून रोजगार निर्माण होऊन आपल्यासारख्या इतरांना आधार देण्याचं काम शोभा खंडागळे करतात. त्यांचे चटणी कांडपाचे दुकान आहे. शिवाय त्या मसाला बनवतात आणि बचत गटांच्या माध्यमातून विकतात. त्यांचा हा मसाला चांगला प्रसिद्ध असून दिल्लीच्या बाजारातही त्याला मोठी मागणी असल्याचे शोभा आनंदाने सांगतात. आधी मी मातीकाम करायचे. पण त्यात कष्टांइतका मोबदला मिळत नसल्याने २००० पासून मी मसाल्याचा व्यवसाय करते असं त्या सांगतात. सुरुवातीला अगदी लहान असणारा हा व्यवसाय त्यांनी आपल्या मेहनतीने मोठा केला आहे. दोन मुलींचं लग्न आणि मुलाचं शिक्षण या व्यवसायमुळे पूर्ण करता आल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. इतकेच नाही आपल्या संसाराबरोबर त्या आपल्या बहीणीचाही सक्षमपणे सांभाळ करतात.

टीव्ही सेंटर भागातच कपड्याच्या दुकानावर काम करणाऱ्या आरती राठोड महिलांनी हिमतीने व्यवसाय करायला हवा असं सांगत होत्या. हिम्मत असेल तर सगळी आव्हानं मोडून पडतात असं त्या अतिशय खंबीरपणे सांगतात. आरती यांच्या पतीला दुर्धर आजार झाल्याने त्यांची नोकरी गेली. त्यामुळे अचानकपणे घरची जबाबदारी आपल्यावर आल्याचे त्यांनी सांगितेल. मागच्या पाच वर्षांपासून हे काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. सुरुवातीपासून स्वत:चा व्यवसाय असावा असं वाटत होतं पण पुरेसं भांडवल नसल्याने ते शक्य होऊ शकले नाही. कालांतराने एका भांडवलदारासोबत त्यांनी कपड्याचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला. अशाप्रकारे हिम्मत ठेवली तर कोणतीही गोष्ट शक्य होते हे सांगताना त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसत होता.

फुलं विकणाऱ्या जयश्री शेळके आणि नाश्ता सेंटर चालवणाऱ्या कमलबाई काकडे यांना भेटल्यावर त्यांचं कर्तृत्वदेखील ओसंडून वाहताना दिसत होतं. फुलांच्या व्यवसायातून जयश्री शेळके यांनी आपला संसार फुलवला होता. तर कमलबाई गेल्या वीस वर्षांपासून नाश्ता सेंटर चलवत होत्या. कामासाठी दोघीही कुटुंबासह शहरात आल्या. स्वतःचा वेगळा चेहरा नसलेल्या या ‘कॉमनवूमन’ दररोज राबतात त्यातूनच त्यांचं कर्तृत्व पहायला मिळत.

First Published on March 8, 2018 7:29 pm

Web Title: womens day 2018 common women daily schedule their struggle for life