सध्या देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी वर्ग आपलं काम घरूनच करत आहेत. यासाठी सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएलनं मोठा निर्णय घेतला आहे. एमटीएनएलनं लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट ग्राहकांना एका महिन्यासाठी ब्रॉडबॅन्ड सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी कंपनीनं याबाबत घोषणा केली.

एमटीएनलच्या ब्रॉडबॅन्ड सेवेचा वापर करणाऱ्या कॉर्पोरेट ग्राहकांना वर्क फ्रॉम होम दरम्यान एका महिन्यासाठी ही सेवा मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा एमटीएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुमार यांनी दिली. अनेक कंपन्यांचे सर्व्हर एमटीएनएलच्या एमपीएलएस नेटवर्कवर आहेत. अशा कंपन्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांकडे एमटीएनएलचं ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहे त्यांना एमटीएनएलच्या व्हीपीएन ओव्हर ब्रॉडबॅन्ड सुविधा देण्यात येईल. याद्वारे ते आपल्या ऑफिसच्या सर्व्हरशी जोडले जाऊ शकतात, असंही त्यांनी नमूद केलं.

या प्रणालीद्वारे त्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये काम करताना ज्या सुविधा मिळतात त्या देण्यात येतील, असंही सुनिल कुमार म्हणाले. सध्या एमटीएनएल अशा प्रकारच्या सेवांसाठी दोन ते अडीच हजारांचे शुल्क आकारते.