सध्याच्या लहान मुलांना घरच्या जेवणापेक्षा फास्टफूडचं जास्त आकर्षण आहे. त्यामुळे पिझ्झा, बर्गर, वडापाव, चिप्स खाण्यावर मुलांचा भर असतो. मात्र सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या शरीरावर आणि आरोग्यावर होत असतो. यातूनच लहान वयातच लठ्ठपणा सारख्या समस्येला समोरं जावं लागतं. इंडोनेशियामधील आर्या परमाना या लहान मुलाचं वयाच्या १० व्या वर्षी १९३ किलो होतो. मात्र अथक परिश्रम आणि योग्य डाएट केल्यामुळे या मुलाने केवळ ४ वर्षांमध्ये १०८ किलो वजन कमी केलं.
सध्या आर्या परमाना याचा एक व्हिडीओ त्याचे ट्रेनर अदे रायने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा २०१६ ते आतापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.
२०१६ मध्ये वयाच्या १० व्या वर्षी आर्याने वजन कमी करण्यास सुरुवात केली. या प्रवासात त्याला काही सर्जरी, डाएट आणि व्यायाम करावा लागला. शस्त्रक्रियेद्वारे आर्याच्या शरीरातील अतिरिक्त जरबी कमी करण्यात आली. शरीरातील अतिरिक्त जरबी कमी करण्यासाठी त्याला २ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. बॅरिएट्रिक सर्जरी (Bariatric surgery), योग्य डाएट आणि नियमित व्यायाम यामुळेच आर्याचं वजन कमी झाल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. आर्या आणि अदे यांची २०१६ मध्ये पहिली भेट झाली. या पहिल्या भेटीमध्ये अदे यांनी आर्याच्या आई-वडिलांना त्याच्या दैनंदिन दिनक्रम विचारला आणि त्याला रोज संतुलित आहार देण्यास सांगितला.
सुरुवातीला आर्या सहज करता येतील असे व्यायाम प्रकार करत होता. त्यानंतर त्याने पंचिंग बॅग, बैठका, वेटलिफ्टिंग असे एक-एक व्यायाम प्रकार करण्यास सुरुवात केली. परंतु हे सारं करणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होतं.
जन्माच्यावेळी आर्याचं वजन साडेतीन किलो होतो. त्यानंतर त्याचं वजन दिवसेंदिवस वाढतच गेलं. २०१४ मध्ये त्याचं वजन प्रचंड वाढलं. त्यावेळी त्याचं वय ८ वर्ष होतं. इतकंच नाही तर त्याचं वजन २ वर्षांमध्ये ८८ किलोने वाढलं. त्यामुळे तो जगातला सर्वात लठ्ठ मुलगा म्हणून ओळखू लागला. याच कारणामुळे त्याच्या घरातल्याने त्याचं वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान, आता आर्याचं वजन प्रचंड कमी झालं आहे. त्यामुळे त्याला ओळखणंही कठीण आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 2:26 pm