17 November 2019

News Flash

वाढते प्रदूषण, ताणतणावामुळे उपराजधानीत ४० टक्के हृदयविकारग्रस्त

बदलती जीवन आणि खानपान शैली, वाढते प्रदूषण आणि ताणतणावामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ासह विदर्भात हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे.

जागतिक हृदय दिन
बदलती जीवन आणि खानपान शैली, वाढते प्रदूषण आणि ताणतणावामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ासह विदर्भात हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. शहरातील २५ ते ४० टक्के लोकांना हदयविकाराचा त्रास आहे तर १५ ते २० टक्के त्याची लक्षणे असताना त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. हृदयरोगांमध्ये ३० ते ५० या वयोगटातील नागरिकांचा जास्त समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
‘वर्ल्ड हार्ट फेडरेशन’ द्वारा २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक ह्रदयदिन साजरा केला जात आहे. इंडस हेल्थ प्लसने वोक्हार्ट रुग्णालयाच्या सहकार्याने नागपूर शहरात केलेल्या सर्वेक्षणानुसार ३०च्या वर वयोमान असलेल्या पुरूष व स्त्रियांमध्ये हा आजार जास्त असल्याचे दिसून आले.
जानेवारी २०१४  ते ऑगस्ट २०१५ या काळात शहरातील विविध भागातील सर्वेक्षणामध्ये १७ हजार ६४७ लोकांशी इंडसने संवाद साधून त्यांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीमधून धमन्यांमध्ये रक्त वाहताना अडथळे असल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. २४ ते ३० टक्के लोकांमध्ये हम्दयविषयक  आजाराचा धोका आहे. तणाव आणि खाणं आणि बदलती जीवनशैली ही हृदयरोगास कारणीभूत असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण नसल्यामुळे लठ्ठपणा वाढतो त्यामुळे उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकारापासून पीडित रुग्णांची संख्या वाढण्यासोबतच हदयविकार असलेल्या रुग्णांचे सरासरी वय देखील २० ते ३० टक्के कमी झाले आहे. शहरांमध्ये राहणारे १० टक्के तर ग्रामीण भागातील जवळपास ७ टक्के लोक हे हदयविषयक आजाराने पीडित आहेत. लठ्ठ असलेल्या ३५ ते ४० टक्के लोकांना हदयविकाराचा धोका आहे.
तळलेले अन्नपदार्थ , चरबीयुक्त आहार हे नागरिकांमध्ये लठ्ठपणा निर्माण करण्यास कारणीभूत आहे. वारंवार छातीत दुखणे, अ‍ॅसिडिटी काम करताना श्वास घेण्यास त्रास होणे ही काही लक्षणे आहेत. ज्यांच्याकडे लोक सामान्यत दुर्लक्ष करतात. जर वेळेवर उपचार केले नाही हा आजाराचे प्रमाण वाढते आणि त्यानंतर आपण डॉक्टरकडे जात असतो.
या संदर्भात हदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, गेल्या काही वर्षांत ‘सायलेन्ट हार्टअ‍ॅटक’ समोर आला आहे. उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान, आणि अनुवांशिकता यामुळे हदयरोगाचे प्रमाण वाढते. नियमित शारीरिक व्यायाम आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले आणि वेळोवेळी तपासणी केली तर हदयरोग टाळू शकतो. घरगुती काम करीत असताना महिलांमध्ये लवकर थकवा येणे आणि थकवा आल्यावर छाती दुखणे ही साधारणत परंपरागत आजारापेक्षा वेगळे असल्यामुळे त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
इंडस हेल्थ प्लसचे प्रतिबंधात्मक आरोग्य संरक्षण तज्ज्ञ अमोल नायकवाडी म्हणाले, पुरूष आणि स्त्रियांबरोबरच युवकांमध्ये हदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रदूषण, धूम्रपान व बैठेकाम करण्याच्या जीवनशैलीसह वाढता तणाव हे हदयविषयक आजार होण्यास कारणीभूत घटक आहेत.
उच्च रक्तदाबापासून पीडित  असलेल्या लोकांनाही हृदयाचे दुखणे असू शकते असेही नायकवाडी म्हणाले.
निदान करून घेतलेल्या लोकांची संख्या
पुरुष ९ हजार ३२१   स्त्रिया ८ हजार ३२६
व्हिटॅमिन १ व २   २४.२१     १९.१४
उच्च रक्दाब       ३६.२७     ३४.२९
हृदयविकार         २५.२८     २७.०८
लठ्ठपणा          ३९.२८       ३३.२७
हायपरलिपिडेमिया   २४.३७     २५.३८

First Published on September 29, 2015 6:40 am

Web Title: world heart day
टॅग Lifestyle