डॉ. नारायण गडकर

करोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात एकच हाहाकार माजला आहे. या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रोगप्रतिकारक क्षमता कमी असणार्‍यांना या आजाराची लागण पटकन होते असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची खास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातच या दिवसांमध्ये हृदयरोगींनीदेखील त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच हृदयविकार असलेल्या किंवा हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी नेमकी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

१. नियमित व्यायाम करणे –
नियमित व्यायाम करणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज न चुकता व्यायाम केला पाहिजे. तसंच व्यायामासोबत चालणे, एरोबिक्स किंवा योगासने करणे हेदेखील केलं पाहिजे. मात्र, कोणताही कठीण व्यायाम प्रकार करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. आहाराकडे लक्ष द्या –
जेवणामध्ये कायम पौष्टिक आणि सकस आहाराचा समावेश करावा. त्यामुळे ताजी फळे, भाज्या, कडधान्य, डाळी यांचं सेवन आवर्जुन करावं. तसंच बाहेरील पदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

३.वेळेवर औषध घ्या –
वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करुन घेणे. तसंच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांची पातळी योग्य आहे की नाही हे पाहणे. सोबतच डॉक्टरांनी दिलेली औषधे न चुकता वेळेवर घ्या.

(लेखक डॉ. नारायण गडकर हे चेंबूरमधील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्डिओलॉजिस्ट सल्लागार आहेत.)