जीन्सला चांगला पर्याय आणि घालून वावरताना जाणवणारा सुटसुटीतपणा यामुळे ‘लेगिंग’ कायम फॅशनमध्ये असतात. कुर्तीच्या रंगाशी मिळत्याजुळत्या किंवा विरोधी रंगातील लेगिंग्ज वापरणे हा अलीकडे ‘कूल फॅशन’ ठरू लागला आहे. तरुणाईमध्ये तर हे लोकप्रिय आहेतच, पण सेलेब्रिटीज आणि डिझायनर्सनीसुद्धा यांच्यावर आपल्या पसंतीची मोहोर लावली आहे.

लेगिंगचं महत्त्व वेगळ्याने सांगायची गरज नाही. ऑफिसमधली मीटिंग, घरगुती पार्टी, मत्रिणींसोबतचं गेटटुगेदर यापैकी काहीही असलं तरी लेगिंग हा एक उत्तम पर्याय असतो. कुर्ती, शर्ट, टी शर्ट, क्रॉप टॉप, गंजी, टय़ुनिक, समर ड्रेस यांपैकी कोणत्याही वस्त्रासोबत लेगिंग स्वत:ला अशी बेमालूम जुळवून घेते की हा एका ‘ड्रेस सेट’चाच भाग वाटतो. लेगिंगला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणत्याही ऋतूचं वावडं नाही.
तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही, इतक्या रंगांमध्ये आणि प्रकारांत लेगिंग बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे मॅचिंगचा प्रश्नसुद्धा मिटतो. त्यामुळे सध्या लेगिंग फॅशनविश्वात लाडकी आहे. या बहुगुणी, बहुपयोगी लेगिंगचे प्रकारही तितकेच आहेत. रोजच्या वापरात आपण कॉटन, लायक्राच्या प्लेन किंवा पिंट्रेड लेगिंग वापरतो. पण याही पलीकडे लेगिंग वेगवेगळ्या स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत.

स्ट्रीप स्टाईल आणि फुटेड लेगिंग्स
कित्येकदा चालताना लेगिंग थोडी वर सरकते किंवा हिल्स घातल्यावर लेगिंगची उंची आखूड दिसते. मात्र, स्ट्रीप स्टाईल आणि फुटेड लेगिंग्स त्यावर चांगला पर्याय आहेत. या लेगिंग्स थेट पायाच्या तळव्यापर्यंत जातात. स्ट्रीप स्टाईलमध्ये लेगिंगला खालच्या बाजूने स्ट्राईप असते, तर फुटेड लेगिंग स्टोकिंगप्रमाणे पूर्ण पाय झाकते. या लेगिंग्स हिल्ससोबत शोभून दिसतात. पार्टीसाठी या लेगिंग्स उत्तम पर्याय आहेत. स्टायलिश टय़ुनिक, टॉप्ससोबत या घालता येतात. फुटेड लेगिंग्स ड्रेस, स्कर्टसोबत इनर म्हणून वापरता येतात.

पार्टी स्टाईल लेगिंग्स
एखाद्या पार्टीला किंवा डिस्कोमध्ये जाताना छान, स्टायलिश टय़ुनिक किंवा क्रॉप टॉप घालायचा असल्यास त्यासोबत नेहमीच्या कॉटन किंवा लायक्राच्या लेगिंग शोभून दिसत नाहीत. त्यासाठी खास पार्टी स्टाईल लेगिंग्स बाजारात पाहायला मिळतात. सिक्वेन्स लेगिंग्स, लेदर लेगिंग्स, डिस्को लेगिंग या प्रकारांत मोडतात. नावाप्रमाणे सिक्वेन्स लेगिंग पूर्णपणे सिक्वेन्सनी भरलेल्या असतात. डिस्को लेगिंगना सेल्फ शाइन असते. या लेगिंग्सच दिसायला स्टायलिश असतात, त्यामुळे अगदी सिम्पल टय़ुनिक किंवा टॉपसोबतसुद्धा या ग्लॅमरस दिसतात.

काफ लेंथ लेगिंग
येत्या पावसाळ्याचा सीझन लक्षात घेता या लेगिंग्स तुमच्या वॉडरोबमध्ये हव्याच. पण फक्त पावसाळा नाही, तर एरवीसुद्धा या लेगिंग्स दिसायला स्टायलिश दिसतात. साधारणपणे गुडघ्याच्या चार-पाच इंच खालपर्यंत या लेगिंगची लांबी असते. त्यामुळे पावसाळ्यात चिखल उडणे, पाण्यात पाय पडून लेगिंग ओली होण्याचा प्रश्न नसतो. कॉटन, लायक्रा कापडांमध्ये वेगवेगळ्या रंगात आणि पिंट्र्समध्ये या लेगिंग उपलब्ध आहेत. टय़ुनिक, शॉर्ट कुत्रे, टी-शर्टसोबत या लेगिंग घालता येतात.

अँकल लेंथ लेगिंग
आपल्या रोजच्या वापरातील लेगिंग अँकल लेंथ असतात, साधारणपणे त्यांची उंची पायाच्या घोटय़ापर्यंत असते. कॉटन, लायक्रा, स्पेंडेक्स कापडात या लेगिंग पाहायला मिळतात. कॉटनच्या लेगिंगना चुडीदार पद्धतीने खालच्या बाजूला चुण्यासुद्धा असतात. वेगवेगळ्या रंगांत, पिंट्र्समध्ये या लेगिंग उपलब्ध आहेत. कॉटनच्या लेगिंग्स कुर्तीसोबत घालायला उत्तम असतातच, पण लायक्रा लेगिंग्स लांब शर्ट, टय़ुनिक, टॉप्ससोबतसुद्धा घालता येतात.

जेगिंग
जीन्स घालयची आवड आहे, पण उन्हाळ्यात ती नकोशी वाटत असेल तर जेगिंग हा त्यावर पर्याय आहे. जेगिंग हा लेगिंगचाच प्रकार असला तरी त्या दिसायला मात्र जीन्सच्या असतात. लायक्राच्या या लेगिंग वापरायला सुटसुटीत असतात आणि जीन्सप्रमाणे वेगवेगळ्या ड्रेसेससोबत जुळून येतात.

लेगिंग्स विकत घेताना घ्यायची काळजी
’ लेगिंग्स विकत घेताना त्याचे कापड नीट तपासा. हलक्या प्रतीच्या कापडाची शिलाई उसविण्याची शक्यता असते.
’ तुमची उंची कमी असेल तर काल्फ लेन्थ, मोठय़ा पिंट्र्सचे लेगिंग्स वापरू नका. तसेच अति बारीक असाल तर उभ्या पट्टय़ांचे पिंट्र्स वापरू नका.
’ फिटेड लेगिंगमध्ये पायाचा आकार दिसून येतो. त्यामुळे तुम्ही पेअर शेपच्या असाल आणि हिप्स, मांडय़ा ओव्हरवेट असतील तर लांब कुर्ता, टय़ुनिक वापरा.
’ लेगिंग ब्राईट पिंट्र्स किंवा पॅटर्नची असेल तर टय़ुनिक, कुर्ता सिम्पल असूद्यात.

कुठे मिळतील?
आधीच म्हटल्याप्रमाणे कॉटन, लायक्राच्या लेगिंग्स ठाण्यातील कपडय़ांच्या सगळ्याच दुकानांत मिळतील. साधारणपणे २०० रुपयांपासून चांगल्या प्रतीच्या लेगिंग्सच्या किमती सुरू होतात. पार्टी स्टाइल लेगिंग्स ब्रँडेड स्टोअर्स किंवा डिझायनर बुटिक्समध्ये मिळतील. गोखले रोड, गावदेवी रोड, राम मारुती रोड येथे अनेक डिझायनर बुटिक्स आहेत. यांच्या किमती ७०० रुपयांपासून सुरू होतात. गावदेवी मार्केटमध्ये प्रिंटेड लेगिंग्स मिळतील.