आज ‘जागतिक क्षयरोग दिन’ आहे. आज या जागतिक दिनाचं औचित्य साधत क्षयरोगाविरूध्द लढण्याची आणि त्याचा समूळ नायनाट करण्याची जग शपथ घेतंय. भारतातही क्षयरोगामुळे दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त रूग्ण मृत्युमुखी पडतात. जगामध्ये क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सर्वात जास्त हिस्सा भारतात होणाऱ्या मृत्यूंचा आहे. जगात क्षयामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू एकट्या भारतात होतात.

पूर्वी क्षयरोग म्हणजे साक्षात् मृत्यू अशीच क्षयरोगाची जनतेत प्रतिमा होती आणि काही प्रमाणात ते खरंही होतं. क्षयरोगावरची औषधं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नसल्याने क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण खूपच जास्त होतं. पण आता क्षयावर उपचाराची नवी, चांगली पध्दत विकसित होऊनही भारतात दरवर्षी दोन लाख नागरिकांचा क्षयरोगमुळे मृत्यू होणं ही आपल्या देशाला खरंच लाजिरवाणी बाब आहे.

२००० साली भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी ‘जागतिक आरोग्य संघटनेने’ प्रमाणित केलेल्या ‘डाॅट्स उपचारपध्दती’चा डोस हैद्राबादमध्ये देत या उपचारपध्दतीचा भारतात शुभारंभ केला. पण ही नवीन उपचारपध्दतीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध न झाल्याने गावपातळीवर तसंच दुर्गम भागात क्षयाचा प्रादुर्भाव झाला तर तिथला मृत्यूदर खूपच जास्त असतो.

भारताता अस्वच्छतेचं प्रमाणही मोठं आहे. आणि नेमकी हीच बाब क्षयरोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरते. क्षयाचे रोगजंतू रूग्णाच्या थुंकीद्वारे पसरतात. आणि आपल्याकडे पान. तंबाखू खात थुंकण्याची सवय सगळ्यांनाच आहे. क्षयाच्या रूग्णाने जर असं कुठे थुंकल्यास क्षयाचे जंतू त्या भागात पसरण्याचा धोका असतो.

जागतिक क्षयरोग दिन १९८२ पासून साजरा करायला सुरूवात झाली. त्याआधी १०० वर्षं म्हणजेच १८८२ साली राॅबर्ट काॅख या शास्त्रज्ञाने क्षयरोगाचं कारण शोधत त्याचा इलाज शोधून काढायला मदत केली होती.

सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात स्वच्छता पाळणे आणि नव्या उपचारपध्दती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हाच या संकटाशी सामना करण्याचा मुख्य उपाय आहे. चला तर मग क्षयरोगाचा नायनाट करूया!