तीन लेन्स असलेल्या ए-७ या मॉडेलनंतर आता सॅमसंगनं चार कॅमेरे असलेला मोबाईल दाखल केला आहे. इतके कॅमेरे असलेला हा जगातला पहिला फोन असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन लेन्सचा कॅमेरा असलेले मोबाईल सॅमसंगपाठोपाठ हुआवेई व एलजीनं दाखल केल्यानंतर आता सॅमसंगनं आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आहे. ऑगस्ट महिन्यात सॅमसंगनं गॅलेक्सी नोट ९ हा महागडा मोबाईल बाजारात आणला होता, आता गुरूवारी ए-९ हे चार लेन्सचं कॅमेरा युनिट असलेला मोबाईल सादर केला आहे. एकेकाळी मोबाईल बाजारावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या सॅमसंगचा बाजारातील हिस्सा घसरला आहे. मात्र, जास्तीत जास्त चांगले मोबाईल बाजारात सादर करून कंपनी पुन्हा झेप घेण्याच प्रयत्न करत आहे.

ए-९ या मोबाईलमध्ये १२८ जीबी इंटर्नल मेमरी असून ती ५१२ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा आहे. व्हर्चुअल असिस्टंट, पेमेंट सेवा सॅमसंग पे, सॅमसंग हेल्थ आदी सुविधाही यात आहेतच. या चार लेन्सचा समावेश असलेल्या कॅमेऱ्याच्या सेटसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा कंपनीनं दावा केला आहे. एकत्रितरीत्या हे कॅमेरा युनिट ४७ मेगापिक्सेल इतकं रेझोल्युशन देणार आहे. मुख्य कॅमेराच २४ मेगापिक्सेलचा आहे. तर अन्य तीन लेन्सेस अनुक्रमे १०, ८ व ५ मेगापिक्सेलच्या आहेत.

जगभरातील मंदीच्यामुळे मोबाईल फोनच्या विक्रीत व परिणामी नफ्यात घट झाल्याचे नुकतेच कंपनीने जाहीर केले होते. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या याट कालावधीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी घसरला होता.