कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार, त्याविषयी उभ्या राहीलेल्या चळवळी आणि त्यासाठी लढा देणारे कर्मचारी यांबाबत आपण अनेकदा वाचतो किंवा ऐकतो. पण एका अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आपल्या वरिष्ठाने शारीरिक सुखाची मागणी करणे ठिक आहे असे जगभरातील चारपैकी एका पुरुषाला वाटते. म्हणजेच हे प्रमाण साधारण २५ टक्के इतके आहे. केअर संस्था आणि हॅरीस पोलने केलेल्या जागतिक सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हे सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये ९४०० प्रौढांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलिया, इजिप्त, भारत, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, लंडन आणि व्हिएतनाम या देशातील लोकांचा समावेश होता.

याबाबत केअर संस्थाचे कार्यकारी अधिकारी मिशेल नन म्हणाले, आपल्या वरिष्ठाने शारीरिक संबंधांची अपेक्षा करणे हा तुमच्या कामाचा भाग असू शकत नाही, तर ते लैंगिक शोषण असते. असे जर घडत असेल तर तो नोकरीच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार आहे हे वेळीच समजून घ्यायला हवे. या सर्वेक्षणानुसार ३२ टक्के महिला आणि २१ टक्के पुरुष लैंगिक शोषणाचे बळी गेले आहेत किंवा त्यांच्यावर लैंगिक हल्ला झाला आहे.

सध्या जगभरात सुरु असलेल्या #MeToo चळवळीचा अनेक देशांत सकारात्मक परिणाम झाल्याचे मत ६५ टक्के महिलांनी या सर्वेक्षणात नोंदवले आहे. भारतातही ट्विटवर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषदेखील मुक्तपणे हा हॅशटॅग वापरून व्यक्त होत आहेत. लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर विषयावर संपूर्ण जगाच लक्ष वेधण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. हॉलिवूड, बॉलिवूड, कॉर्पोरेट, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर अनेक क्षेत्रातील लोक या हॅशटॅगचा वापर करुन आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत आहेत.