शाओमी आणि रिअलमी या दोन्ही चीनच्या कंपन्या गेल्या काही वर्षांमध्ये भारतात चांगल्याच लोकप्रिय ठरल्या आहेत. एकमेकांच्या प्रोडक्ट्सला टक्कर देण्याचा दोन्ही कंपन्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. पण, आता एका मोबाईल फिचरवरुन दोन्ही कंपन्या एकमेकांना लक्ष्य करतायेत.

काय आहे प्रकरण :-
रिअलमीचे भारतातील प्रमुख माधव सेठ यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा देणारी रिअलमी ही पहिली कंपनी होती असं नमूद केलं. रिअलमी XT स्मार्टफोनबाबत माहिती देताना त्यांनी हे विधान केलं होतं. त्यावर लगेचच शाओमीच्या सब-ब्रँड डायरेक्टर स्नेहा ताईनवाला यांनी माधव सेठ यांना टॅग करत रिप्लाय दिला आणि माधव सेठ यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला.


स्नेहा ताईनवाला यांचा रिप्लाय :-

माधव यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत स्नेहा यांनी माधव सेठ यांना टॅग केलं, “माधव सर, तुमचा पूर्ण आदर ठेवते, पण कृपया खोटं बोलून ग्राहकांची दिशाभूल करु नका. जगातला पहिला 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा असलेला फोन रेडमी नोट ८ प्रो होता आणि तो फोन आम्ही ऑगस्ट २०१९ मध्ये लाँच केला होता…आतातरी तुम्ही खोटं बोलणार नाहीत अशी अपेक्षा ठेवते” असं ट्विट केलं.


दरम्यान, शाओमी आणि रिअलमी या दोन्ही चिनी कंपन्या असून भारतीय मार्केटमध्ये सध्या या दोन्ही कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे.