तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेले SIM कार्ड आता मेमरी कार्ड अर्थात माइक्रो एसडी कार्डचंही काम करेल. चिनची आघाडीची कंपनी Xiaomi यावर काम करत आहे. ज्या ग्राहकांना फोनमध्ये जास्त स्टोरेजची गरज भासते, पण माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट नसतो अशा ग्राहकांसाठी हे SIM कार्ड अत्यंत फायद्याचं ठरणार आहे.

सध्या लाँच होणाऱ्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असतो. पण, भविष्यात माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनच्या संख्येत खूप घट होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. भविष्यातील हा ट्रेंड ओळखून शाओमी कंपनीने माइक्रो एसडी कार्डप्रमाणे काम करु शकणाऱ्या नव्या सिम कार्ड डिझाइनचे पेटंट तयार केले आहे.

शाओमीच्या या ड्युअल सिम कार्डमध्ये 5G सपोर्ट असेल. पण, हे सिमकार्ड केवळ शाओमी आणि रेडमी स्मार्टफोन्समध्येच कार्यरत असेल अशी चर्चा आहे. 2019 मध्ये शाओमीने अशाच प्रकारचे एक कार्ड सादर केले होते. पण, आता कंपनीने या टेक्नॉलॉजीचे पेटेंट फाइल केले आहे. त्यामुळे भविष्यात कंपनी ड्युअल सिम कार्ड लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.