स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही ब्रँड ‘शाओमी’ने, भारताची स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टिम NavIC ला आपल्या स्मार्टफोनमध्ये स्थान देणार असल्याची घोषणा केली आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेल तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे.

जानेवारी महिन्यात क्वॉलकॉमने तीन नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 720G, 662 आणि 460 लाँच केले आहेत. त्यासोबत जीपीएसचा ‘मेड इन इंडिया’ पर्याय NavIC चा सपोर्ट देण्यात आला आहे. आता लवकरच NavIC तंत्रज्ञान भारतातील स्मार्टफोनमध्ये उपलब्ध केले जाईल असे शाओमीने म्हटले आहे.  GPS असताना NavIC ची आवश्यकता काय? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर, 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान अमेरिकेने भारताला पाकिस्तानी लष्कराशी निगडीत GPS डेटा देण्यास नकार दिला होता. तेव्हा पहिल्यांदा भारताला स्वतःच्या नेव्हिगेशन सिस्टिमची आवश्यकता भासली. दोन दशकांनंतर, आता ISRO ची क्वॉलकॉम आणि शाओमीसोबत NavIC सिस्टिमबाबत चर्चा सुरू आहे.

शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी याबाबत ट्विटरद्वारे घोषणा केली. या घोषणेसोबतच त्यांनी एक फोटोही शेअर केला. यामध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (ISRO) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना Redmi K20 Pro हा स्मार्टफोन देताना दिसत आहेत.  Redmi K20 Pro मध्ये NavIC तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला नाहीये, पण लवकरच हे तंत्रज्ञान भारतातील स्मार्टफोनमध्ये उपलब्ध केले जाईल असे शाओमीने म्हटले आहे.

भारताशिवाय अनेक देशांकडे स्वतःची नेव्हिगेशन सिस्टिम आहे. रशियाकडून GLONASS चा वापर केला जातो. तर, युरोपियन युनियन आणि चीन अनुक्रमे Galileo आणि BeiDou सॅटेलाइट सिस्टिम्स (BDS) चा वापर करतात.