5G सपोर्ट आणि तब्बल 108 MP कॅमेरा असलेला Xiaomi Mi 10 हा स्मार्टफोन भारतात अखेर शुक्रवारी (दि.8)  लॉन्च होणार आहे. कंपनीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. Mi 10 हा फोन 31 मार्च रोजी लॉन्च केला जाणार होता. पण, करोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने या फोनची लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता केंद्र सरकारने इ-कॉमर्स कंपन्यांना ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये अत्यावश्यक नसलेल्या सामानांची परवानगी दिल्यामुळे Xiaomi ने Mi 10 लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात मागील बाजूला तब्बल 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह चार कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे.

Mi 10 हा फोन भारतात 8 मे रोजी एका ऑनलाइन इव्हेंटद्वारे लॉन्च केला जाईल. हा फोन कंपनीने फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये Mi 10 Pro सोबत लॉन्च केला होता. पण प्रो, व्हेरिअंट भारतात लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे. कारण, कंपनीने केवळ Mi 10 या फोनचाच टीझर जारी केला आहे.

फीचर्स –
हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असेल. फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप म्हणजेच मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा तब्बल 108 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,780 एमएएच क्षमतेची बॅटरीही आहे. फोनमधील अन्य फीचर्सची माहिती अद्याप मिळालेली नाही.

किंमत –
Mi 10 ची किंमत किती असेल याबाबत कंपनीने काहीही माहिती दिलेली नाही. पण, शाओमीचे भारतातील प्रमुख मनू कुमार जैन यांनी यापूर्वी हा फोन प्रीमियम सेगमेंटमधील असेल असे म्हटले होते. म्हणजे हा फोन महाग असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये या फोनची किंमत (बेसिक मॉडेल) भारतीय चलनानुसार जवळपास 42,400 रुपये आहे.