‘शाओमी’ कंपनीने शुक्रवारी (दि.8) एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये Mi 10 5G स्मार्टफोन लॉन्च केला. त्यासोबतच कंपनीने भारतातील आपला पहिला ऑनलाइन स्ट्रीमिंग मीडिया प्लेयर अर्थात Mi Box 4K स्ट्रीमिंग डिव्हाइसही भारतीय बाजारात उतरवण्याची घोषणा केली. त्यानंतर या डिव्हाइससाठी रविवारी पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. या सेलला शानदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा 13 मे रोजी या डिव्हाइससाठी सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. फ्लिपकार्ट आणि Mi.com या संकेतस्थळांवर दुपारी 12 वाजेपासून Mi Box 4K साठी सेलला सुरूवात होईल. सेलमध्ये काही खास आकर्षक ऑफर्सही आहेत.

3,499 रुपये किंमत असलेल्या आणि दिसायला अगदी लहान असलेल्या या डिव्हाइसमध्ये फीचर्स मात्र शानदार आहेत. या डिव्हाइसच्या मदतीने तुमच्या जुन्या साध्या टीव्हीवरही स्मार्ट टीव्हीचा आनंद घेता येईल. याद्वारे ‘अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टीक’ला टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.HDMI पोर्टद्वारे हे डिव्हाइस कोणत्याही टीव्हीला कनेक्ट करता येतं. कनेक्टिव्हिटीसाठी या डिव्हाइसमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ फीचर असून युजर्सना Android TV वर उपलब्ध हजारो अ‍ॅप्स आणि सर्व्हिस वापरता येतात. यामध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, Disney+ Hotstar यांसारख्या लोकप्रिय स्ट्रीमिंग सेवांचा समावेश आहे. Mi Box 4K हे अँड्रॉइड टीव्ही 9 पायवर कार्यरत असणारं डिव्हाइस आहे.

Mi TV Box 4K दिसायला साध्या सेट-टॉप बॉक्सप्रमाणे आहे आणि साध्या सेट-टॉप बॉक्सप्रमाणेच केवळ HDMI केबलद्वारे कोणत्याही टीव्हीशी कनेक्ट करता येते. हे डिव्हाइस क्वॉड-कोर अ‍ॅमलॉजिक प्रोसेसरवर कार्यरत असून यात 2 जीबी रॅम + 8 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. यात HDR 10 फॉर्मेटसोबतच 4K कंटेंट स्ट्रीमिंगची सुविधा मिळते. डिव्हाइसमध्ये 4के आणि एचडीआर कंटेंट सपोर्ट करणारे नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसारखे सर्व प्लॅटफॉर्म सहज स्ट्रीम करता येतात. या बॉक्समध्ये Xiaomi च्या टीव्हीमध्ये असणारा पॅचवॉल इंटरफेस नाहीये, त्याऐवजी Mi Box 4K केवळ स्टॉक अँड्रॉइड टीव्ही इंटरफेसवर काम करतो. ज्यांच्याकडे साधा टीव्ही आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. Mi Box 4K मध्ये युएसबी पोर्ट आणि 3.5 मिलिमीटर डिजिटल आउट सॉकेट देखील आहे.  तसेच या डिव्हाइसमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट अल्ट्रा देखील आहे. याद्वारे युजर्स त्यांच्या फोन किंवा लॅपटॉपमधील कंटेंट(4K)थेट टीव्हीवर बघू करु शकतात.

किंमत :-
Mi Box 4K ची भारतात किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे.