शाओमीने अद्याप आपल्या नव्याने येणाऱ्या Mi Mix 2s या मोबाईलबद्दलच्या कोणत्याही गोष्टी जाहीर केलेल्या नाहीत. मात्र मोबाईलच्या मार्केटमध्ये कोणताही नवीन फोन येणार असला की त्याचे फिचर्स लीक होतात, त्याचप्रमाणे शाओमीच्या या फोनचे फिचर्स लीक झाले आहेत. विशेष म्हणजे या फोनचे फिचर iPhone X सारखे असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या शाओमीच्या फोनचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरीही शाओमीचे नवीन मॉडेल असेच असेल असे बोलले जात आहे.

मागील वर्षी अॅपलनं आपला सर्वात महागडा iPhone X हा फोन लाँच केला. अद्यावत तंत्रज्ञानानं युक्त असलेल्या या फोनमधल्या फेस रिकग्नेशन फीचरनं त्याला वेगळी ओळख दिली. पण, लाँच केल्यानंतर अॅपलच्या या महागड्या फोनला अपेक्षित प्रतिसाद न लाभल्यानं यावर्षी त्या फोनची निर्मिती बंद करण्याचं कंपनीने ठरवले. त्यालाच टक्कर देणारा आणि त्याच्याशी मिळतीजुळती फिचर्स असणारा फोन शाओमी बाजारात आणत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शाओमीच्या या नव्या Mi Mix 2s फोनला आयफोनप्रमाणे होमचे बटण नसेल अशी शक्यता आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ खरा असेल असे धरले तर या फोनचा फिंगरप्रिंट स्कॅनरही iPhone X प्रमाणे असेल असे म्हटले जात आहे. मात्र शाओमीने अशाप्रकारे आपल्या मोबाईलला फिंगरप्रिंटचा पर्याय देणे हे पहील्यांदाच झालेले नाही. यामध्ये ८४५ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल तसेच ५.९९ इंचाची एचडी स्क्रीन असेल असेही सांगण्यात येत आहे. ८ जीबी रॅम असलेल्या या फोनला १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच ड्युएल कॅमेरा आणि ३४०० मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे.