गेल्या महिन्यापासून लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. परंतु अद्यापही ईलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करता आलं नाही. अशातच भारतीय बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी ओप्पो आणि शाओमी या कंपन्यांनी चीनमधून स्मार्टफोन्स आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या कंपन्या स्मार्टफोन्सचं उत्पादन भारतातच करत आहे. परंतु सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी चीनमधून फोन आयात करणं आवश्यक असल्याचं मत एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केलं.

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त लॅपटॉप आणि डिशवॉशर्सच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. तसंच पूर्वीच्या तुलनेत याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांनी या वस्तूंची आयातही दोन ते चार टक्क्यांनी वाढवली आहे. ईकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. बाजारातील मागणी व्यतिरिक्त प्रवासी मजूर उपलब्ध नसणं तसंच लॉकडाउनमुळे बंद असलेल्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये सरकारच्या नियमांचं पालन करूनही सुरू करण्यात आलेल्या उत्पादनानं तितका जोर पकडला नाही. सध्या २२ टक्के आयात शुल्क लागू असल्यानं कंपन्यांना नुकसानही सोसवं लागू शकतं.

आयात करणं आवश्यक

ओप्पोचा ग्रेटर नॉएडामधील प्रकल्प कर्मचाऱ्यांना झालेल्या करोनाच्या संसर्गामुळे बंद करावा लागला होता. परंतु सध्या पुन्हा एकदा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. परंतु सध्या या ठिकाणी केवळ ३० टक्केच उत्पादन सुरू आहे. याच प्रकल्पात रिअलमी आणि वनप्लसच्या मोबाईल्सचंदेखील उत्पादन करण्यात येतं. हे ब्रँडदेखील आयातीशी निगडीत काही पर्याय शोधत आहेत. सध्या २२ टक्के आयात शुल्क लागू असल्यामुळे वनप्लस आणि रिअलमीकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, प्रकल्पातील उत्पादन क्षमता पूर्ववत होईपर्यंत चीनमधून आयात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिडरेंज सेगमेंटमध्ये मोठी मागणी

बाजारातील तज्ज्ञांच्या मते शाओमी आपल्या क्षमतेच्या केवळ ३० ते ४० टक्के उत्पादन करत आहे. तर विवोसारख्या अन्य कंपन्यांचीही तिच स्थिती आहे. “भारतातील आरोग्य आणि सुरक्षाविषय सर्व बाबींना ध्यानात घेऊन आम्ही वनप्लस ७ सीरिजच्या आणि वनप्लस ८ सीरिजच्या सर्व मोबाईल फोनचं उत्पादन भारतात सुरू केलं आहे,” अशी प्रतिक्रिया वनप्लस इंडियाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.