शाओमीचा पावरफुल स्मार्टफोन अशी ओळख असलेला पोको एफ1 च्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे. आता 17 हजार 999 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. ही किंमत ‘पोको एफ1’च्या 6जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटसाठी असेल. शाओमी कंपनी लवकरच Redmi K20 मालिकेतील फोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळेच पोकोच्या किंमतीत घट झाल्याची चर्चा आहे. रेडमी के20 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असून या प्रोससरसह स्वस्त फोन बनविण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. पोको स्मार्टफोन लाँच झाला त्यावेळी स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असलेला तो सर्वात स्वस्त फोन होता. 17 हजार 999 या नव्या किंमतीमुळे पोको एफ1 सध्या गॅलेक्सी एम40 आणि मोटोरोला वन व्हिजन या फोनपेक्षाही स्वस्त झाला आहे. पोकोच्या इतर व्हेरिअंटच्या किंमतीबाबत सांगायचं झाल्यास 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम+256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27 हजार 999 रुपये आहे.

पोको एफ 1 हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच केला होता. तेव्हापासून तिसऱ्यांदा फोनच्या किंमतीत घट झाली आहे. लाँचिंगवेळी 23 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत होती. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे इंफ्रारेड फेस अनलॉक फीचर. या फीचरच्या मदतीने तुम्ही अंधारात असो, किंवा उजेडात, चेहऱ्याच्या मदतीने फोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या फोनमध्ये दमदार प्रोसेसर देण्यात आलं आहे. क्वालकॉम फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरमुळे जर अतिवापरामुळे फोन गरम झाल्यास आपोआप कूलिंग होईल. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम / 64 जीबी इंटरनल स्टोरेज, 6 जीबी रॅम / 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे.

या फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तर पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 4000mah ची बॅटरी फोनमध्ये देण्यात आली असून अॅन्ड्रॉइड 8.1 ओरियो आधारित मीयुआय 9.6 प्रणालीवर हा फोन कार्यरत राहिल. फोनचा मागील भाग पॉलीकार्बोनेट ब्लॅक रंगाचा आहे. रोस्सो रेड , स्टील ब्ल्यू आणि ग्रॅफाइट ब्लॅक या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.