शाओमी पुन्हा एकदा भारतातील क्रमांक एकचा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारात शाओमी कंपनीच्या स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झालीये. या कालावधीत विविध कंपन्यांच्या एकूण ४६.६ मिलियन युनिट्सची विक्री झालीये, यापैकी एकट्या शाओमीने १.२६ कोटी युनिट्सची विक्री केली आहे. यात सर्वाधिक फटका सॅमसंग कंपनीला बसला आहे. तरीही सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.  इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC)च्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

शाओमीच्या फोन्सची विक्री वाढण्यामागे त्यांच्या संकेतस्थळावर सण-उत्सवांच्या काळात दिला जाणारा भरघोस डिस्काऊंट यामागचं कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. आयडीसीच्या असोसिएट रिसर्च मॅनेजर उपासना जोशी यांच्या मते, “ई कॉमर्स संकेतस्थळावर आकर्षक ऑफर, बायबॅक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय यामुळे विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षानुवर्षे २८.३ टक्क्यांनी वाढणारा हा आकडा आता ४५.४ टक्क्यांवर गेला आहे”. गेल्या वर्षीच्या तुलनेत शाओमीची ८.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सॅमसंगने ८८ लाख युनिट्सची विक्री केलीये. सॅमसंगच्या वार्षिक विक्रीत ८.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. शाओमीचे Redmi 7A आणि Redmi Note 7 Pro हे सर्वात विकलेले फोन ठरले आहेत.

आणखी वाचा- Xiaomi चा ‘सुपर सेल’; 4,499 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्टफोन

आयडीसीच्या आकडेवारीनुसार, पहिल्या क्रमांकावर शाओमी, दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग, तिसऱ्या क्रमांकावर व्हिवो, चौथ्या क्रमांकावर रिअलमी आणि पाचव्या क्रमांकावर ओप्पो कंपनी आहे. १५ ते ३५ हजार रुपये किंमतीच्या फोनचा या विक्रीत एकूण १८.९ टक्के हिस्सा आहे. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्के वाढ आहे. २१ ते २५ हजार रुपये किंमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वात वेगवान अर्थात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. यात OnePlus 7, Redmi K20 Pro आणि vivo V15 Pro या फोनला सर्वाधिक पसंती मिळाली. याशिवाय १५ ते २१ हजार रुपये किंमतीच्या सेगमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे. यात Galaxy A50, Redmi Note 7 Pro आणि vivo Z1 Pro या स्मार्टफोनला सर्वाधिक पसंती मिळालीय.