मोबाईल कंपन्या आपली उत्पादने बाजारात विकली जावीत यासाठी सतत काहीना काही नवीन प्रयोग करत असतात. या प्रयोगांमधून त्यांना चांगला फायदा होतो आणि त्यांचे उत्पादन विकलेही जाते. आता शिओमी कंपनीने अशीच एक अनोखी ऑफर आणली आहे. यामध्ये जुना शिओमीचा फोन देऊन तुम्हाला नवीन फोन घेता येणार आहे. यासाठी कॅशफाय या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा जुना फोन विकून नवीन फोन खरेदी करता येईल. विशेष म्हणजे हे सगळे घरबसल्या करता येऊ शकते.

कॅशफाय वेबसाईटची टीम ग्राहकांच्या जुन्या फोनची किंमत आधी निश्चित करतील आणि त्यानंतर ग्राहकांना नवीन फोनच्या किंमतीबाबत सांगण्यात येईल. म्हणजेच तुमच्या जुन्या फोनची किंमत तुम्ही कॅशफायच्या वेबसाईटवर जाऊन ठरवू शकता. मात्र आपला फोन या वेबसाईटवर विकला जात आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. तुमच्या एमआय फोनमध्ये काही बिघाड असल्यास त्याची किंमत कमी करुन तुम्हाला फोनची किंमत सांगण्यात येईल. शिओमीचा कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी केवळ एकच हँडसेट एक्सचेंज करता येणार आहे .

याआधी शिओमीचा नोट ४ ग्राहकांत खूपच लोकप्रिय झाला. स्वस्त, मजबूत आणि टिकाऊ या ग्राहकांच्या तिन्ही गरजांची पूर्तता या फोनने केली. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन उपलब्ध असल्याने एमआयच्या खपात बरीच वाढ झाली. चीनमध्ये सर्वाधिक विक्रीचा टप्पा गाठल्यानंतर शिओमी भारतीय बाजारपेठेत सॅमसंगलाही टक्कर देताना दिसत आहे. आपले पुढचे मॉडेलही लवकरच लाँच करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. रेडमी मधील इन्फ्रारेड रिमोट फंक्शनशी अनेक टीव्ही, सेट टॉप बॉक्स, एअर कंडिशन्स, स्पीकर या फोनने ऑपरेट करता येतात. आयआर सेन्सर आणि मी रिमोट अ‍ॅप अनेक घरातील अप्लायन्सला सपोर्ट करतात. याशिवाय फोनची बॅटरी अतिशय चांगली असून, कॅमेरा आणि इतर फिचर्सही चांगले असल्याने ग्राहकांची शिओमीला पसंती असल्याचे दिसते.