स्वस्तात मस्त आणि टिकाऊ फोन देणाऱ्या शाओमीनं बघता बघता भारतीय बाजारपेठेत आपला जम बसवला. शाओमीनं गेल्या वर्षभरात सॅमसंग या भारतीय बाजारपेठेतील आघा़डीच्या कंपनीला जबरदस्त टक्कर दिली. परवडणाऱ्या दरात शाओमीचे फोन असल्यानं भरभरून प्रतिसाद भारतीय ग्राहकांकडून लाभला. शाओमीच्या रेडमी ४ ला तुफान पसंती ग्राहकांकडून लाभल्यावर आता नववर्षातला पहिला फोन शाओमी लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकताच शाओमीनं Redmi 5 आणि Redmi 5 प्लस हे दोन फोन चीनमध्ये लाँच केले असून पुढील आठवड्यात Redmi 5 किंवा Redmi 5 प्लस हे फोन भारतात लाँच करण्यात येतील अशी चर्चा आहे.

iPhone महागला, सगळया मॉडेल्सचे भाव सरासरी तीन टक्क्यांनी वाढले

शाओमीकडून मात्र या फोनच्या लाँचिंगबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात शाओमीचा बहुप्रतीक्षित Redmi 5 आणि Redmi 5 प्लस हे फोन लाँच होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. काही इंग्रजी वेबसाईट्सनं दिलेल्या माहितीनुसार हे फोन १४ फेब्रुवारीला भारतात लाँच होऊ शकतात. लीक झालेल्या माहितीनुसार रेडमी ५ मध्ये ५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले आहेत. या फोनमध्ये १२ मेगा पिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. उत्तम सेल्फी घेण्यासाठी यात सॉफ्ट टोन सेल्फी फ्लॅश आणि ब्युटीफाय फीचरही असणार आहे.

शाओमीनं पूर्वी लाँच केलेले फोन हे समाधानकारक असल्यानं ग्राहकांचा तुफान प्रतिसाद या फोनला लाभला. त्यामुळे शाओमी हे दोन्ही फोन कधी लाँच करतोय याची भारतीय ग्राहकांना प्रतिक्षा आहे म्हणूनच ट्विटरवर देखील Redmi 5 आणि Redmi 5 प्लस हे फोन लाँच होत असल्याचं कळताच ‘#GiveMe5’ हा हॅशटॅग व्हायरल होऊ लागला.