शाओमी या चिनी कंपनीने अगदी कमी काळात भारतीय बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाओमीच्या एमआय नोट ४ च्या प्रचंड यशानंतर बहुप्रतिक्षीत शाओमी रेडमी नोट ५ हा फोनही लाँच केला. त्यानंतरही कंपनीने आपली अनेक आकर्षक मॉडेल बाजारात दाखल करत आपल्या ग्राहकांना खूश केले. आता कंपनीने आपले आणखी एक नवीन मॉडेल दाखल करत ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. या मोबाईलचे नाव आहे Xiaomi Redmi Mi 6X, भारतात या फोनला Mi A2 या नावाने ओळखले जात असून हा फोन म्हणजे Xiaomi Mi A1 चे अपडेटेड व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे. हा फोन शाओमीच्या ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू या रंगांबरोबरच फ्लेम रेड या आणखी एका नव्या रंगातही उपलब्ध आहे.

आता या फोनचे ३ वेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. त्यात ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेला आणि ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी यांचा समावेश आहे. हे फोन अनुक्रमे १६,९००, १९,००० आणि २१,००० या किंमतींना उपलब्ध आहेत. हा फोन आज चीनमध्ये लाँच करण्यात आला असून तो भारतात कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या फोनला ५.९९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून हा फोन Redmi Note 5 Pro सारखा दिसतो. २.२ गिगाहार्टजचा ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन ६६० चा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन ८.१ ओरियोवर आधारित मीयूआय ९.५ सॉफ्टवेअरवर काम करतो. विशेष म्हणजे फोटोग्राफीसाठी यामध्ये विशेष फिचर देण्यात आले आहे. त्यामुळे फोनची गुणवत्ता चांगली होण्यास मदत होणार आहे. या फोनला २ रिअर कॅमेरे देण्यात आले असून त्यातील एक १२ तर दुसरा २० मेगापिक्सलचा आहे. याबरोबरच सेल्फी कॅमेराही २० मेगापिक्सलचा आहे. या फोनची बॅटरी ३०१० मिलिअॅम्पियर्सची आहे.