जर तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, कारण शिओमीचा रेडीमी नोट फोर हा हँडसेट चक्क १ रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. काय बसला ना धक्का?
दरवर्षी शिओमी Mi Fan Festival चे आयोजन करते. या एकदिवसाच्या फेस्टिव्हमध्ये ग्राहकांना सवलतीच्य दरात उत्पादनं खरेदी करता येतात. ६ एप्रिलला एमआयच्या अनेक उत्पादनांवर सवलत असणार आहे. यानुसार ग्राहकांना १ रुपयांत एमआयचा रेडीमी नोट फोर हा फोन विकत घेता येणार आहे. हा पण त्यासाठी एक अट आहे. हा फोन फक्त एमआयच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध असणार आहे. त्यासाठी ग्राहकांना एमआयचे मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. अॅपवर नोंदणी केल्यानंतरच ग्राहक हा फोन खरेदी करू शकतो. ही सवलत ६ एप्रिलला सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

त्याचप्रमाणे दुपारी दोन वाजल्यापासून एमआयच्या पॉवर बँकही १ रुपयांत उपलब्ध असणार आहेत. तर रेडमी नोट ए फोर रोझ गोल्ड हँडसेट ५९९९ आणि ९९९९ मध्ये उपलब्ध होणार आहे. शिओमचा रेडमी नोट फोर गेल्याच महिन्यात लाँच करण्यात आला. यात ५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगला आहे, कारण यात २.५ डी ग्लास लावण्यात आली आहे ज्यामुळे मोबाइल अधिक आकर्षक दिसतो आहे. ‘रेडमी नोट फोर’चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टू जीबी – थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी, फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असे तीन प्रकार निवडू शकता. हा मोबाइल पूर्णपणे मेटलचा बनविण्यात आला आहे. शिओमीने यात स्नॅपड्रॅगॉनचा ६२५ ऑक्टा कोर हा प्रोसेसर आणि अड्रिनो ५०६ हा जीपीयू वापरला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलमधील गेम्स अधिक चांगल्या प्रकारे आणि विनाअडथळा खेळू शकता तसेच नेहमीच्या वापरातील लहान, मोठे अ‍ॅपसुद्धा सहज वापरू शकता.

या प्रोसेसरचे वैशिष्टय़ असे की हा खूप कमी वीज वापरतो, ज्यामुळे कमी बॅटरीचा उपयोग होतो आणि तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर अधिक काळ करू शकता. शिवाय यात ४१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे त्यामुळे एकदा मोबाइल चार्ज केल्यानंतर एक ते दीड दिवस सहज वापरू शकता. ‘रेडमी नोट फोर’मध्ये दोन सिम कार्डची सुविधा आहे. परंतु एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता.हा मोबाइल अ‍ॅण्ड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.