Xiaomi Redmi या चायनिज कंपनीने नुकतीच एक घोषणा केली आहे. कंपनीकडून नवीन वर्षात स्मार्टफोनचे एक दमदार मॉडेल लाँच केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या बाजारात सध्या जोरदार स्पर्धा असून दिवसागणिक बाजारात नवनवीन फोन दाखल होताना दिसतात. Xiaomi ही कंपनी यामध्ये आघाडीवर आहे. आता कंपनी ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोबाईल बाजारात दाखल करणार आहे. आता कंपनीने या फोनच्या मॉडेलचे नाव सांगितलेले नसून लवकरच ते आपल्याला समजेल. जानेवारी २०१९ मध्ये हा फोन लाँच होणार आहे.

या नव्या फोनमध्ये इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असेल असे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे सुविधा असलेला हा Mi चा पहिलाच फोन असेल. हा फोन सॅमसंग आणि ऑनर या फोनच्या मॉडेलला टक्कर देणार आहे. आता इतके मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत किती असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर कंपनीने अधिकृतपणे याची घोषणा केली नसली तरी या फोनची किंमत २१ हजार रुपये असेल असे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मनु कुमार जैन यांनी सांगितले होते, की कंपनी लवकरच आपला नवीन फोन लाँच करणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर आणि ४८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येणार आहे. हा तोच फोन असल्याचे आता लक्षात येत आहे. त्यामुळे तुम्ही उत्तम कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर हा निश्चितच उत्तम पर्याय आहे.