चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने 10 जानेवारीला 48 मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोन लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. याआधी कंपनीने डिसेंबर 2018 मध्ये एका कार्यक्रमात यासंबंधी घोषणा केली होती, मात्र त्यावेळी त्यांनी कोणतीही तारीख जाहीर केली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन Mi-Series स्मार्टफोन्सच्या कॅटेगरीत नसणार आहे. हा स्मार्टफोन एका नवीन फ्लॅगशिप फोन असेल ज्याला रेडमी ब्रॅण्ड अंतर्गत लाँच केलं जाईल. या लाँचसोबतच रेडमी एक स्वतंत्र वेगळा ब्रॅण्ड होईल.

स्मार्टफोन लाँच करण्याआधी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत पूर्णपणे रेडमी ब्रॅण्डवर फोकस करण्यात आलं आहे. फोटोत रेडमी लिहिलेलं दिसत असून, त्याच्या सावलीत 48 नंबर दिसत आहे. यावरुन कंपनी 48 मेगापिक्सल स्मार्टफोन लाँच करण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. मात्र फोटोमध्ये कुठेही स्मार्टफनच्या फिचर्स किंवा इतर गोष्टींची माहिती देण्यात आलेली नाही.

हा पोस्टर पाहिल्यानंतर शाओमी आता रेडमीला एक स्वतंत्र ब्रॅण्ड म्हणून प्रमोट करण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे कंपनीला विक्री आणि नफ्यात फायदा मिळतो. वेगवगळे ब्रॅण्ड असल्याने मार्केट शेअरमध्येही कंपनी फायद्यात असते. काही रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये 10 जानेवारीला दुपारी 2 वाजता हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. Redmi Pro 2 हाच तो स्मार्टफोन असू शकतो. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या रेडमी प्रो स्मार्टफोनचा हा फोनचा हा पुढील टप्पा असल्याचं म्हटलं जात आहे.

जे पोस्टर्स सोशल मीडियावर लीक झाले आहेत त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये 11 nm Snapdragon 675 चिपसेट असणार आहे. स्मार्टफोन लाँच होण्यासाठी अजून एक आठवडा शिल्लक असून अनेकांना काय फिचर्स असतील याची उत्सुकता लागली आहे.