शाओमी कंपनीने Youpin ब्रँडअंतर्गत एक नवीन इलेक्ट्रिक सायकल आणली आहे. विशेष म्हणजे Xiaomi Youpin HIMO Z16 नावाची ही इलेक्ट्रिक सायकल सहजपणे फोल्ड करता येते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इ-सायकल 80 किलोमीटरचा प्रवास करु शकते. जाणून घेऊया शाओमीच्या या खास इलेक्ट्रिक सायकलबाबत…

केवळ 22.5 किलो इतकं वजन असलेली शाओमी HIMO Z16 दिसायला एखाद्या सामान्य इलेक्ट्रिक सायकलप्रमाणेच आहे. पण, ही सायकल सेंट्रल बॉडी, फुड पेडल आणि सायकलच्या हँडबारमध्ये अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून फोल्ड करता येते. फोल्ड झाल्यावर ही सायकल सहजपणे गाडीच्या डिक्कीतही ठेवता येणे शक्य आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये वॉटरप्रूफ एचडी एलसीडी स्क्रीन आहे. या स्क्रीनमध्ये सायकलचा स्पीड, पॉवर, आणि मायलेज यांसारख्या फीचर्सची माहिती मिळते. तसेच जर सिस्टममध्ये काही तांत्रिक अडचण आली तर याची माहितीही स्क्रीनवर दिसते. सायकलमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक देखील आहे.

प्योर पावर, पावर असिस्टेड आणि पेडल असे तीन मोड या सायकलसाठी देण्यात आले आहेत. 25 किलोमीटर प्रति तास इतका टॉप स्पीड असलेली ही सायकल एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर प्योर मोडमध्ये 55 किलोमीटरपर्यंत आणि पॉवर असिस्टेड मोडमध्ये 80 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यासह या सायकलच्या मुख्य बीममध्ये बॅटरी लपवलेली आहे. त्यात अँटी थेफ्ट लॉक आहे जेणेकरून बॅटरी चोरीला जाऊ शकत नाही.  शाओमीच्या या खास इलेक्ट्रिक सायकलची किंमत 2,499 युआन, म्हणजे जवळपास 27 हजार रुपये आहे. पण, सध्या ही इ-सायकल केवळ चीनमध्येच उपलब्ध आहे.