पाठदुखीने त्रस्त असाल तर त्यासाठी योगासने हा उत्तम उपाय असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. भारत, इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून योगा करणे हे आरोग्याला हितकारक असल्याचे सिद्ध झाले असून, त्यामुळे दीर्घकाळापासून असलेल्या पाठीच्या दुखण्यापासून दिलासा मिळत असल्याचे दिसून आले आहे.

पाठीचे दुखणे हे बहुतांशपणे प्रत्येकाला भेडसावणारा आजार असून त्यावर स्वत:ची काळजी किंवा विविध प्रकारच्या औषधांचाच मारा केला जातो. सध्याच्या जीवनशैलीत व्यायाम हा उत्तम पर्याय ठरू शकतो, म्हणूनच योगा हा या आजारावरील उत्तम उपचारपद्धती असल्याचे सिद्ध होते. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील सुसान वाइलँड यांच्या म्हणण्यानुसार पाठीच्या दुखण्यावर योगा हाच योग्य पर्याय असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. कारण योगाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली असून दैनंदिन जीवनशैलीतदेखील पाठीच्या आजारावर योगा निश्चितच परिणामकारक उपचारपद्धती आहे. या वेळी संशोधकांनी ३४ ते ४८ वयोगटातील १ हजार ८० पुरुष आणि महिलांचे परीक्षण केले. या वेळी संशोधकांना व्यायाम न करणाऱ्यांमध्ये पाठीच्या आजाराशी निगडित समस्या अधिक असल्याचे दिसून आले, तर योगा करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण बऱ्याच अंशी कमी असल्याचे दिसून आले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)