नियमित योगाभ्यास केल्याने वृद्धत्वाच्या उंबरठय़ावर असतानाही स्नायूंना बळकटी येऊन मानसिक आरोग्यही सुधारते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबत इंग्लंडमधील एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी आढावा घेतला आहे. वृद्धत्वाकडे झुकण्याच्या वयातील लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर योगाभ्यासाचा काय परिणाम होतो, याबाबतच्या २२ अभ्यास अहवालांचे विश्लेषण त्यांनी केले आहे.

योगाभ्यासाच्या वर्गामध्ये एक महिन्यापासून सात महिने कालावधीच्या, तसेच ३० ते ९० मिनिटांपर्यंतच्या सत्रांचा समावेश होतो. या अभ्यासकांनी योग करणारे आणि कोणताही व्यायाम न करणारे, तसेच योग करणारे आणि चालणे, खुर्चीत बसून एरोबिक्स करणारे यांच्यात तुलना करणाऱ्या अभ्यासांतील निष्कर्षांना सांख्यिकी विश्लेषणाची जोड दिली.

याविषयी एडिनबर्ग विद्यापीठातील दिव्या सिवरामकृष्णन यांनी सांगितले की, वृद्धत्वाकडे झुकलेल्या लोकांपैकी अनेक जण हे शारीरिक हालचालींच्या दृष्टीने निष्क्रिय असतात. आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था आणि सरकारने शिफारस केल्याप्रमाणे ते संतुलन आणि स्नायूंची तंदुरुस्ती राखू शकत नाहीत. अशा लोकांची मानसिक आणि शारीरिक अवस्था योगाभ्यासामुळे सुधारू शकते, असा निष्कर्ष आपण या अभ्यासातून काढू शकतो. योग ही एक हळुवार क्रिया असल्याने वाढत्या वयातील दुखणी लक्षात घेऊन तो सुसह्य़ करण्यासाठी बदल करता येतो, असे त्या म्हणाल्या.

वाढत्या वयात निष्क्रिय राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत योग करणाऱ्या व्यक्तींना चांगला तोल सांभाळता येतो, त्यांना सहज हालचाली करणे शक्य होते, पायांची ताकद वाढते, झोप चांगली लागते, मानसिक-शारीरिक व्याधी कमी होतात, असे संशोधकांना दिसून आले.