रोज योगसाधना केल्यास शुक्राणूंचा दर्जा सुधारतो, त्यामुळे वंध्यत्वाच्या काही प्रकारांवर मात करता येते, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राच्या एका अभ्यासात म्हटले आहे. नेचर रिव्ह्य़ू युरॉलॉजी या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात म्हटले आहे, की डीएनएतील बिघाडामुळे शुक्राणूंचा दर्जा घसरतो, त्यामुळे होणारी संतती आरोग्यसंपन्न असतेच असे नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या शरीरशास्त्र व युरॉलॉजी, ऑबस्टेट्रिक्स व गायनॅकॉलॉजी या शाखांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे.

प्रमुख संशोधक प्राध्यापक डॉ. रीमा दाडा यांनी सांगितले, की शुक्राणू जर दर्जेदार नसतील, तर वंध्यत्वाची शक्यता असते त्यामुळे वारंवार गर्भपात होतात, जन्मत: दोष निर्माण होतात. हे सगळे शुक्राणूचा डीएनए खराब असेल तर होते. डीएनए खराब होण्याचे कारण ऑक्सिडेटिव्ह ताण हे असते. ऑक्सिडेटिव्ह ताण हा मुक्त कणात वाढ व शरीराच्या ऑक्सिजन क्षमतेतील घट यामुळे निर्माण होतो. पुरुषातील शुक्राणू पेशी या ताणाला बळी पडत असतात. प्रदूषण, कीटकनाशके, कीडनाशके, विद्युतचुंबकीय प्रारणे यांचा त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. हे सगळे घटक काही सुधारणांनी टाळता येतात. त्यात जीवनशैलीत बदल हा महत्त्वाचा घटक आहे. रोज योगसाधना केल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. डीएनएची हानी कमी होते व टेलोमीअरची लांबी कमी होत नाही म्हणजेच आपले आयुष्य वाढण्याचे ते निदर्शक असते. २०० पुरुषांचा सहा महिने अभ्यास केल्यानंतर त्यांच्यात शुक्राणूंवरील ऑक्सिडेटिव्ह ताण २१ दिवसांनी कमी झाला व त्यांच्या डीएनएचा दर्जाही उंचावला. शुक्राणूंचे वहनही सुधारले. योगसाधनेमुळे वार्धक्याची प्रक्रिया कमी वेगाने होते. टेलोमीअरची लांबी कायम ठेवली जाते त्यामुळे दीर्घायुष्य लाभते.