News Flash

कंबरदुखी दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त

इतरही अनेक फायदे

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रवास, दिवसभर एकाच स्थितीत खुर्चीत बसणे यामुळे कंबरदुखीचा त्रास वारंवार उद्भवतो. मात्र, यावर योगासनाचा उत्तम उपाय आहे. ठराविक आसने नियमित केल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होते. उग्रासनाने या समस्येवर त्वरीत आराम मिळतो. हे आसन दंड स्थिती आणि बैठक स्थिती अशा दोन स्थितींमध्ये करता येते.

बैठक स्थितीत हे आसन कसे करतात ते पाहूया. प्रथम पाय पसरून ताठ बैठक स्थितीत बसावे. मग पायामध्ये काटकोनाइतके किंवा कमी अंतर ठेवून बसावे. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडावे. अंगठे पकडताना अंगठा आणि तर्जनीचा वापर करावा. नंतर श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा. साधारणपणे या आसनाचा कालावधी कपाळ टेकवल्यानंतर १० सेकंदाचा असावा. जास्तीत जास्त कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या आसनात केला जातो. जेवढे जास्त खाली जाता येईल तेवढे जास्त कपाळ खाली घेऊन थांबावे. रोजच्या सरावाने आसनाचा कालावधी वाढवता येतो लठ्ठ व्यक्तींच्या पोटाच्या घेरामुळे त्यांना कपाळ जमिनीला टेकवण्यास अडचण येते तसेच मांडय़ांच्या स्नायूंवरही ताण येतो पण तरीही त्या व्यक्तींनी प्रयत्न न सोडता हे आसन करावे.

हे आसन दंड स्थितीतही करतात. दंड स्थितीत हे आसन करताना दोन्ही पाय जवळ घेऊन उभे रहावे. मग दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यावे. श्वास सोडत सावकाश कपाळ अर्थात डोके जमिनीवर टेकवावे. दंडस्थितीतील हे आसन करण्यापूर्वी समोर चादरीची जाड घडी ठेवल्यास कपाळाला जमीन टोचत नाही. त्यापूर्वी खाली वाकताना दोन्ही हात कपड्याच्या घडीशेजारी उभे ठेवून वाकावे. कपाळ घडीवर टेकताच दोन्ही हात लांब करून दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे गुडघे पकडावेत. आसन स्थितीत संथ श्वसन चालू ठेवावे. बऱ्याच व्यक्तींना दंड स्थितीतील उग्रासन करताना प्रथम त्यांचे कपाळ खाली टेकत नाही. पण कपाळ जेवढे खाली नेता येईल तेवढे न्यावे. हळूहळू सरावाने कपाळ जमिनीला टेकते. या दोन्ही स्थितीत पायांवर चांगला ताण येतो तसेच मांडय़ांच्या आतील स्नायूंवर दाब येतो. प्रयत्नाने दोन्ही स्थितीतील आसनाची आदर्श अवस्था प्राप्त करता येते.

या आसनाचे अनेक फायदे आहेत. पाठीलाही चांगला ताण मिळतो त्यामुळे मज्जारज्जूचे कार्य चांगले सुधारते. पाठीच्या कण्याला चांगला व्यायाम मिळतो. हे आसन जर नियमित केले तर शरीराला हलकेपणा येतो. पोटावर चांगला ताण येतो त्यामुळे पाचक ग्रंथी चांगल्याप्रकारे स्त्रवतात व पचनकार्य सुधारते. याशिवाय, गर्भाशयाच्या स्नायूंचे कार्य सुधारते, पाळीच्या तक्रारी दूर होतात, कंबरेपासून मानेपर्यंत पाठीच्या कण्याला चांगला ताण मिळतो त्यामुळे पाठदुखीचे विकार बरे होतात. या आसनाचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे मनावर संयम येतो.

दंडस्थितीतील या आसनामुळे कमरेतील सांध्यावर खूपच ताण येतो. सांध्यांची कार्यक्षमता सुधारते. पाय ताणल्यामुळे उदरस्थ इंद्रियांवर ताण पडतो. त्यामुळे पचनसंस्थेची इंद्रिय सुधारतात. तेथील ग्रंथींचे स्त्राव चांगल्याप्रकारे स्त्रवू लागतात. टाळू जमिनीवर टेकल्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो. रक्तपुरवठा करण्याचे अधिक श्रम हृदयाला पडत नाही. हात लांब केल्यामुळे हाताचे स्नायू बळकट होतात.

थोडक्यात पचन, उत्सर्जन आणि जनन या तीनही संस्थांचे कार्य उग्रासनामुळे सुधारते. ज्या लोकांना पाठीच्या मणक्यांचे विकार आहेत म्हणजे स्पॉडिलायटिस रूग्णांनी हे आसन करू नये. तसेच हृदयविकार, मेंदूचे विकार, डोक्याचे विकार, डोक्याला जखम असलेल्यांनी हे आसन करू नये. आसन करताना शरीराचा तोल दोन्ही पाय आणि टाळू यावर नीट सांभाळून संथ श्वसन करावे. हे आसन योगशिक्षक, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 12:36 pm

Web Title: yogasan useful for back pain many more uses also
Next Stories
1 उद्यानांमुळे मुलांची एकाग्रता विकसित होण्यास मदत
2 त्वचेमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत
3 खूशखबर! बहुप्रतिक्षित ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर व्हॉट्सअॅपवर उपलब्ध
Just Now!
X