आहारामध्ये दररोज दहय़ाचा वापर केल्याने हाडे ठिसूळ होण्यापासून (ऑस्टिओपोरोसिस) बचाव होतो. यामुळे हाडांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याचा दावा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात करण्यात आला आहे.

दहय़ामध्ये हाडांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये असतात. ती हाडांना बळकटी देण्याचे काम करतात. हा निष्कर्ष फार काही आश्चर्यकारक नसल्याचे, आर्यलडमधील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या इमॉन लेआर्ड यांनी यांनी म्हटले आहे.

दुग्धजन्य पदार्थ आणि हाडांचा कमकुवतपणा याबद्दलचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन आहे. त्यानुसार, आहारामध्ये दहय़ाचे प्रमाण वाढवल्यामुळे हाडांची घनता वाढते. तसेच त्यामुळे वृद्ध महिला आणि पुरुषांमधील हाडे ठिसूळ होण्याचे (ऑस्टिओपोरोसिस) प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले.

ऑस्टिओपोरोसिस हा आजार हाडे ठिसूळ झाल्यामुळे होतो. हाडांची झीज झाल्यामुळे हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. संशोधकांनी हा अभ्यास करण्यासाठी १ हजार ५७ महिला आणि ७६३ पुरुषांचा अभ्यास केला. यामध्ये त्यांच्या हाडांतील खनिजांचे मूल्यमापन करण्यात आले.

यामध्ये सहभागी झालेल्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. यामध्ये जे लोक आठवडय़ातून दोन-तीन वेळा, दररोज आणि कधीही दही न खाणाऱ्यांची यादी करण्यात आली. तसेच यामध्ये इतर दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, धूम्रपान, मद्यपान करणे आणि इतर हाडांच्या आरोग्याला प्रभावित करणाऱ्या घटनांचा अभ्यास करण्यात आला. शरीरातील कॅल्शियम अथवा जीवनसत्त्व ‘ड’ची मात्रा कमी झाल्यामुळे हाडांची झीज होण्यास सुरुवात होते. ती कमी होऊ नये, यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत. दही घेण्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका ५२ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना आढळून आले.