रात्रीची झोप सुखाची लागावी असे वाटत असेल तर धूम्रपान सोडा असा मोलाचा सल्ला संशोधनाअंती देण्यात आला आहे. धूम्रपानामुळे कर्करोग होतो, हृदयविकार होतो हे तर खरेच आहे पण त्यामुळे शरीराचा ताल बिघडतो व झोपेवरही अनिष्ट परिणाम होतो असा या नवीन अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
धूम्रपानामुळे फुफ्फुसे व मेंदू यांचे सिरकाडियन घडय़ाळाचे कार्य बिघडते. आपल्या शरीरातील सिरकाडियन घडय़ाळ हे तापमान व सूर्यप्रकाश अशा इतर अनेक घटकांवर चालत असते व ती शरीरातील क्रियांचा समतोल साधणारी एक प्रक्रिया आहे. धूम्रपानामुळे चांगली शांत झोप लागत नाही तसेच बोधन क्षमता कमी होते व आपले मूड सतत बदलतात. बहुतांशी ते नैराश्य व चिंता या दोन गोष्टींना कारणीभूत ठरतात.
न्यूयॉर्कमधील रॉशेस्टर येथील युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सेंटरच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख इरफान रहमान यांनी सांगितले की, धूम्रपान केल्याने त्या धुराचा श्वास यंत्रणेवर व मेंदूवरही वाईट परिणाम होतो.
सिगारेटमधील संयुगे श्वासमार्गात व मेंदूकडे ज्या मार्गाने जातात ते सारखेच असतात. त्यामुळे तंबाखूच्या धुरामुळे आजार झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त आहे. रहमान व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे दाखवून दिले की, धूम्रपानामुळे फुफ्फुसातील विशिष्ट जनुकांचा आविष्कार किंवा त्यांना चालू करणारे चक्रही बिघडते व त्यामुळे फुफ्फुसात आग जाणवते तसेच मेंदूवरही त्याच पद्धतीने परिणाम होऊन नैराश्य येते.
कमी किंवा जास्त काळाच्या धूम्रपानाने सिरटुइन १ (एसआयआरटी-१, वयाचे परिणाम रोखणारा रेणू) या रेणूचे प्रमाण कमी होते परिणामी बीएमएएल१ या प्रथिनाची पातळी बदलते, उंदरांवर केलेल्या प्रयोगात या प्रथिनाची पातळी मेंदू व फुफ्फुसे या दोन्ही अवयवातील उतींमध्ये कमी दिसून आली.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीतही नेमका हाच परिणाम होतो व त्यांना क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह  पलमोनरी डिसीज हा आजार जडतो. धूम्रपानातील धुरामुळे उंदरांच्या हालचाली खूप मंदावल्याचेही दिसून आले. बीएमएएल-१ हे प्रथिन एसआयआरटी-१ या रेणूने नियंत्रित होते व एसआयआरटी-१ चे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम झोपेच्या तक्रारीवर होतो.  उंदीर व माणूस यांच्यात हे परिणाम सारखेच आहेत. एसआयआरटी-१ या रेणूला कार्यान्वित करणारा घटक वापरून या परिणामांवर मात करता येते. फॅसेब नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
धूम्रपान केल्याने त्या धुराचा श्वास यंत्रणेवर व मेंदूवरही वाईट परिणाम होतो. सिगारेटमधील संयुगे श्वासमार्गात व मेंदूकडे ज्या मार्गाने जातात ते सारखेच असतात. त्यामुळे तंबाखूच्या धुरामुळे आजार झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसातील विशिष्ट जनुकांचा आविष्कार किंवा त्यांना चालू करणारे चक्रही बिघडते व त्यामुळे फुफ्फुसात आग जाणवते तसेच मेंदूवरही त्याच पद्धतीने परिणाम होऊन नैराश्य येते.