सध्या धकाधकीच्या जीवनामुळे डिप्रेशन येणे हे अगदी सामान्य झाले आहे. मग यावर उपाय म्हणून कोणी समुपदेशकाची मदत घेतात तर कोणी आणखी काही उपाय करतात. मात्र ज्या सोशल मीडियावर आपण दिवसातला सर्वाधिक वेळ अॅक्टीव्ह असतो. त्यावरुनही आता तुम्ही डिप्रेस आहात की नाही हे समजू शकणार आहे.

अनेकांना आपल्या फेसबुक पोस्ट किंवा इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करण्याची सवय असते. या पोस्टवरुन तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात हे समजू शकणार आहे. संशोधकांनी असा एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार केलाय ज्याव्दारे हे डिप्रेशन नोंदविले जाऊ शकते. हा प्रोग्रॅम एकावेळी ७० टक्के डिप्रेस्ड लोकांचा शोध घेऊ शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेतील वर्मोंट विश्वविद्यापीठाच्या क्रिस्टोफर डेनफोर्थ यांच्या माहितीनुसार, “सोशल मीडिया अॅपवर काही लोकांच्या अकाऊंटचा आम्ही अभ्यास केला. त्यावेळी लक्षात आले की, डिप्रेशनमध्ये असलेल्यांचे फोटो गडद रंगांमध्ये असतात. शिवाय, त्यांच्या फोटोंवर लोकांनी अधिक कमेंटही केलेल्या असतात. अनेकदा यांमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.” डिप्रेस लोक सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त पोस्ट अपलोड करतात असेही त्यांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.

संशोधकांनी सोशल मीडियावरील विविध अॅपचा वापर करणाऱ्या १६६ यूझर्सचा अभ्यास केला. यामध्ये ४३ हजार ९५० फोटोंचं निरीक्षण करुन विश्लेषण करण्यासाठी या कम्प्युटर प्रोग्रामचा वापर करण्यात आला होता. यातील ७१ लोकांच्या वैद्यकीय तपासणीनंतर ते डिप्रेशनमध्ये असल्याचे लक्षात आले. ‘ईपीजे डाटा सायन्स’ या मासिकामध्ये हे संशोधन प्रकाशितही झाले आहे.