करोना संकटकाळात व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅप Zoom बरंच लोकप्रिय ठरलं. ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘स्टडी फ्रॉम होम’मुळे Zoom ची डिमांड वाढली आहे. ऑफिसची मिटिंग किंवा ऑनलाइन क्लासेससाठी बहुतांश लोकं Zoom चा वापर करतात. युजर्सना चांगली सेवा देण्यासाठी Zoom देखील नवनवीन फिचर्स आणत आहे. आता Zoom मध्ये अजून एक नवीन फिचर आलं आहे.

या नव्या फिचरद्वारे ऑनलाइन मिटिंगमध्ये व्यत्यय आणणाऱ्या सदस्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवता येणार आहे. अनेकदा ऑनलाइन मिटिंग किंवा क्लास सुरू असताना एखाद्या सदस्यामुळे इतरांनाही त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्ती कधीकधी तर कोणत्याही कारणाशिवाय मिटिंगमध्ये व्यत्यय आणत असते. पण आता नवीन फिचरमुळे अशाप्रकारे व्यत्यय आणणाऱ्या सदस्याला मिटिंग सुरू असतानाच बाहेरचा रस्ता दाखवता येणार आहे. यासोबतच त्या सदस्याला ब्लॉक करण्यासाठी रिपोर्ट देखील पाठवता येणार आहे.

हे नवीन फिचर ‘सस्पेंड पार्टिसिपेंट एक्टिविटीज’ नावाने रोलआउट करण्यात आलं आहे. युजरने मिटिंग पॉज करुन ‘सस्पेंड पार्टिसिपेंट एक्टिविटीज’ फिचरवर टॅप केल्यास मिटिंगमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांची नावं समोर येतील. त्यातील ज्या व्यक्तीला मिटिंगमधून बाहेर काढायचं असेल त्याचं नाव सिलेक्ट केल्यास तो सदस्य मिटिंगमधून आपोआप बाहेर पडेल. यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर ‘रिपोर्ट युजर’ फिचरवर क्लिक करुन नको त्या व्यक्तीविरोधात रिपोर्ट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय ‘सिक्युरिटी बॅच’मध्ये दिसेल. हा पर्याय मिटिंगमध्ये व्यत्यय आणणाऱ्या सदस्याला ब्लॉक करण्यासाठी उपयोगी पडेल. एखाद्या युजरला रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीचे डिटेल्स आणि त्याच्या कृत्याचे स्क्रीनशॉटही शेअर करु शकतात. यानंतर झूमची ट्रस्ट अँड सेफ्टी टीम त्या व्यत्यय आणणाऱ्या युजरला ईशारा देईल. त्यानंतरही जर युजरमध्ये सुधारणा झाली नाही, आणि त्याच्याविरोधात सतत तक्रारी येत राहिल्यास कंपनी त्याला ब्लॉक करु शकते. हे दोन्ही फिचर मोफत उपलब्ध असतील.