जे कर्मचारी सतत बैठी कामे करतात त्यांनी झुम्बा नृत्यावर आधारित व्यायाम केल्यामुळे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता आणि होणारी भावनिक चलबिचल स्थिर होण्यास मदत होत असल्याचे अभ्यासात आढळले आहे. संशोधकांनी अगदी थोडय़ा वेळासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामाचा सहभागी लोकांच्या आयुष्यमानावर नेमका काय परणिाम होतो, तसेच हा परिणाम लघू की दीर्घ कालावधीसाठी होतो याचा अभ्यास केला.

स्पेनमधील ग्रॅनडा युनिव्हर्सिटी आणि नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत पाच आठवडे अभ्यास केला. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिवसभरात आठ तासांचे बैठे काम करावे लागते. या बैठय़ा कामाचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी काही चांगल्या सवयी लावून घेण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांसाठी व्यायामाच्या काही नवीन पद्धती विकसित करणे आवश्यक आहे.

जीवनाचा दर्जा कसा असावा याबाबत अनेक व्यापक संकल्पना आहेत. यामध्ये प्रमुख्याने आठ विभाग करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक, भावनिक, शारीरिक स्थिती, शारीरिक वेदना, शारीरिक कार्य, चेतना, मानसिक आरोग्य आणि सामान्य आरोग्य यांचा समावेश होतो, असे संशोधकांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना आठवडय़ातून तीन दिवस रोज एक तास या प्रमाणे शारीरिक व्यायाम करण्यात सांगण्यात आले. यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा घडून येण्यास सुरुवात झाली, असे हेल्थ एज्युकेशन नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनामध्ये म्हटले आहे. हा व्यायाम सलग दोन महिने केल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जीवन दर्जा पातळीमध्ये सर्व आघाडय़ांवर सुधारणा झाल्याचे दिसून आले.