10 Dry Nuts For Common Health Issues: सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. त्यामुळेच मोठी माणसं आणि आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मात्र, सुका मेवा योग्य वेळी आणि मर्यादित प्रमाणातच खावा लागतो. सुक्या मेव्याचे अतिसेवन आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी सुक्या मेव्याचा समावेश केला पाहिजे. तुमच्या आरोग्याच्या आधारावर तुम्ही कोणत्या सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे हे जाणून घेऊ… आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

जाणून घ्या रोज खावे असे १० ड्राय फ्रूट्स

१. बदाम- जर तुम्हाला तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारायचे असेल, तर बदाम खा. कारण- त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. दररोज किमान ७ ते ११ बदाम खाण्याचा प्रयत्न करा. त्यांना रात्रभर भिजवल्याने पोषक घटकांच्या शोषणात अडथळा आणणारे कोणतेही फायटोकेमिकल्स निघून जातात.

२. ब्राझील नट्स- थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य सांभाळण्यासाठी सेलेनियमने समृद्ध असलेले पदार्थ खा; जसे की ब्राझील नट्स. थायरॉईडच्या योग्य कार्यासाठी तज्ज्ञ दररोज किमान दोन ब्राझील नट्स खाण्याची शिफारस करतात.

३. काजू- काजू हाडांच्या आरोग्यास मदत करतात. कारण- ते मॅग्नेशियमचा चांगला स्रोत प्रदान करतात, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होते.

४. पिस्ता- जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर पिस्त्याचं सेवन फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन बी६ भरपूर असते आणि तो एक उत्तम आरोग्यदायी नाश्ता ठरतो, विशेषतः संध्याकाळी.

५. शेंगदाणे- स्नायू मजबूत होण्यासाठी शेंगदाण्यांमधून प्रथिने मिळवा. नियमितपणे सेवन करण्यापूर्वी तुम्हाला शेंगदाण्यांची अॅलर्जी नाही याचीही खात्री करून घ्या.

६. अक्रोड- अक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहेत. त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूची जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात.

७. हेझलनट्स- ऑक्सिडेटिव्ह ताण आणि पेशींच्या नुकसानीचा सामना करण्यासाठी, हेझलनट्स खा. ते अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात, जे शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यात क जीवनसत्त्वसुद्धा असते, ज्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हे जीवनसत्त्व शरीरातील संक्रमण आणि इतर रोगांचा बचाव करण्यास मदत करते. त्यात ई जीवनसत्त्व असते, जे एक शक्तिशाली अॅंटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखता येतो.

८. पेकान- हे नट्स अक्रोडसारखे दिसतात. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल, तर पेकान नट्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. ते मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचा चांगला स्रोत आहेत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

९. मॅकाडामिया नट्स- मॅकडामिया नट्स त्यांच्या निरोगी चरबीमुळे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यासदेखील मदत करतात.

१०. पाइन नट्स- तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पाइन नट्स खा. ते पोषक घटकांनी व खनिजांनी समृद्ध असतात, जे ऊर्जा प्रदान करतात आणि त्वचेचे आरोग्य सुधारतात.

टिकाऊपणासाठी हवाबंद कंटेनर वापरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुका मेवा हवाबंद कंटेनरमध्ये साठवा; जेणेकरून त्यांचा ऑक्सिजनशी संपर्क मर्यादित राहील, ज्यामुळे तो जास्त काळ ताजा व कुरकुरीत राहील. तसेच त्याची थंड, कोरड्या जागी साठवणूक करा. काजू थंड, कोरड्या जागी ठेवा. सूर्यप्रकाश टाळा, ज्यामुळे सुका मेवा लवकर खराब होणार नाही.