10 Minutes Walk After Meal For Blood Sugar Control: आरोग्य उत्तम राखण्यासाठी छोट्या सवयी किती मोठा बदल घडवून आणू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेवणानंतरची केवळ १० मिनिटांची शतपावली. अनेकदा आपण तासनतास व्यायाम करतो, मात्र योग्य वेळी केलेली ही छोटीशी चाल रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) स्थिर ठेवण्यास जिममधील तासाभराच्या व्यायामापेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकते.

अनेक लोक दिवसाला ८,००० ते १०,००० पावले चालण्याचे उद्दिष्ट ठेवतात. मात्र, नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, तुम्ही किती पावले चालता यापेक्षा ती केव्हा चालता याला जास्त महत्त्व आहे. प्रामुख्याने जेवणानंतर शरीर ज्या पद्धतीने प्रतिसाद देते, तिथेच या सवयीची खरी ताकद दिसून येते.

पावलांच्या संख्येपेक्षा वेळेला महत्त्व का?

आपण जेवल्यानंतर शरीर कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते, जे रक्ताभिसरणात मिसळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. प्रीडायबिटीज किंवा टाइप-२ डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी ही वाढ अत्यंत तीव्र असू शकते.

जेवणानंतर लगेच चालल्यामुळे स्नायू या ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी करू लागतात. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही. पुण्यातील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. स्वाती तयाल गोराय सांगतात की, “जेवणानंतर योग्य वेळी केलेली १० मिनिटांची शतपावली रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आश्चर्यकारकपणे प्रभावी ठरते. यामुळे स्नायू ग्लुकोजचा कार्यक्षमतेने वापर करतात आणि साखरेची पातळी अचानक वाढत नाही.”

काय सांगते संशोधन?

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) आणि अमेरिकन डायबिटिज असोसिएशनच्या अभ्यासानुसार, दिवसभरात एकदाच मोठा व्यायाम करण्यापेक्षा प्रत्येक जेवणानंतर केलेली छोटी चाल रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास अधिक मदत करते.

या सवयीचे फायदे

  • इन्सुलिन संवेदनशीलता: चालण्यामुळे स्नायूंना ग्लुकोज वापरण्यासाठी कमी इन्सुलिन लागते, त्यामुळे शरीराची इन्सुलिन कार्यक्षमता सुधारते.
  • पचन सुधारते: जेवणानंतर चालल्यामुळे अन्नाचे पचन सुरळीत होते आणि पोट फुगण्यासारख्या तक्रारी कमी होतात.
  • थकवा दूर होतो: जेवणानंतर येणारी सुस्ती किंवा ग्लानी साखरेच्या चढ-उतारामुळे येते, जी चालण्यामुळे कमी होते.
  • मानसिक शांतता: कामाच्या गडबडीत १० मिनिटांचा ब्रेक घेतल्याने मानसिक ताणही हलका होतो.

व्यग्र दिनचर्या असलेल्यांसाठी सोपे उपाय

डॉ. गोराय यांच्या मते, ही सवय अतिशय व्यावहारिक आणि शाश्वत आहे. यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही.

१. जेवणानंतर २०-३० मिनिटांच्या आत १० मिनिटे चाला.
२. घराच्या गॅलरीत किंवा टेरेसवर फेऱ्या मारा.
३. वेग मध्यम ठेवा, धावण्याची किंवा वेगाने चालण्याची गरज नाही.
४. सातत्य ठेवा.

लक्षात ठेवा, १० मिनिटांची ही चाल संतुलित आहार, डॉक्टरांनी दिलेली औषधे किंवा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही, तर ती एक पूरक सवय आहे. आरोग्यामध्ये मोठा बदल हा अचानक घडत नसून, अशा छोट्या आणि सातत्यपूर्ण निर्णयांतून घडतो.