24 Hours Fasting Effects On Body: वजन कमी करण्यासाठी अनेक जण कमी खाणे, डाएटिंग किंवा उपवासाचा पर्याय निवडतात. पण सलग २४ तास काहीही न खाल्ल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? वजन कमी करण्याव्यतिरिक्त त्याचा शरीरावर आणखी काही परिणाम होतो का? आणि हा प्रकार प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का? २४ तास अन्न न घेणे हा इंटरमिटंट फास्टिंगमधील ‘ईट-स्टॉप-ईट’ पद्धतीचा एक प्रकार मानला जातो. या काळात साधारणपणे कॅलरी नसलेली पेये घेतली जातात आणि २४ तास पूर्ण झाल्यानंतर नेहमीचा आहार घेतला जातो. मात्र, हा प्रकार प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही.

२४ तास उपवास केल्यावर शरीरात काय बदल होतात?

शरीराला सतत ऊर्जेची गरज असते. या ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे ग्लुकोज. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमधून मिळणारा ग्लुकोज शरीर वापरते आणि अतिरिक्त ग्लुकोजचा काही भाग लिव्हर आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवला जातो.

उपवास सुरू झाल्यानंतर शरीर आधी या साठवलेल्या ग्लायकोजनचा वापर करू लागते. साधारण १८ ते २४ तासांच्या आसपास हा साठा कमी झाल्यानंतर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबीचा वापर वाढवते. या काळात शरीर ग्लुकोनिओजेनेसिसच्या प्रक्रियेतून आवश्यक ग्लुकोज तयार करू शकते. म्हणजेच, बराच वेळ अन्न न मिळाल्यास शरीर हळूहळू उपलब्ध ऊर्जा-स्रोत बदलत जाते. मात्र, उपवासाचा कालावधी आणखी वाढल्यास शरीरावर वेगळा ताण येऊ शकतो. दीर्घकाळ पुरेसे पोषण न मिळाल्यास शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंच्या ऊतींचाही वापर करू शकते. त्यामुळे २४ तासांचा उपवास आणि अनेक दिवस उपाशी राहणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

वजन कमी करण्यासाठी २४ तास उपवास खरंच फायदेशीर आहे का?

आठवड्यातून एक-दोन वेळा २४ तास उपवास केल्यामुळे एकूण कॅलरीचे सेवन कमी होऊ शकते. त्यामुळे काही लोकांना वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. पण वजन कमी करण्यासाठी उपवास करणे हा एकमेव किंवा आवश्यक मार्ग नाही. दररोजच्या आहारातून योग्य प्रमाणात कॅलरी कमी करणे आणि संतुलित आहार घेणे हाही प्रभावी पर्याय असू शकतो.

इंटरमिटंट फास्टिंगबाबत झालेल्या काही संशोधनांमध्ये वजन कमी होण्याचे फायदे दिसून आले असले, तरी दीर्घकाळ उपवासाची पद्धत पाळणे काही लोकांसाठी कठीण ठरू शकते. उपवासानंतर काही जणांना खूप जास्त खाण्याची इच्छा होऊ शकते आणि त्यामुळे ओव्हरईटिंग किंवा बिंज ईटिंग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे फक्त वजनाच्या काट्यावर परिणाम पाहण्याऐवजी ही पद्धत दीर्घकाळ सुरक्षित आणि टिकाऊ आहे का, हेही महत्त्वाचे आहे.

वजन कमी करण्याव्यतिरिक्त उपवासाचे आणखी काही परिणाम?

इंटरमिटंट फास्टिंगवर झालेल्या संशोधनात शरीरातील ग्लुकोज, इन्सुलिन, वजन आणि रक्तातील काही चरबीचे घटक यांच्यात सकारात्मक बदल दिसून आल्याचे आढळते. काही संशोधनांमध्ये सिस्टमिक इन्फ्लेमेशन म्हणजे शरीरातील दाह यावरही संभाव्य परिणाम दिसून आला आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की २४ तास उपवास केल्याने प्रत्येक व्यक्तीला हे सर्व फायदे निश्चितपणे मिळतील.

उपवासाचा परिणाम व्यक्तीचे वय, आरोग्य, आहार, औषधे आणि जीवनशैली यानुसार बदलू शकतो.

२४ तास उपवास केल्याने कोणाला त्रास होऊ शकतो?

एक दिवसाचा उपवास अनेक निरोगी प्रौढांसाठी सहन करण्याजोगा असू शकतो; मात्र प्रत्येकासाठी तो योग्य असेलच असे नाही.

  • मधुमेह असलेले लोक
  • पूर्वी किंवा सध्या ईटिंग डिसऑर्डरचा त्रास असलेले लोक
  • अन्नासोबत घेणे आवश्यक असलेली औषधे घेणारे
  • मुले आणि कमी वयातील व्यक्ती
  • गर्भवती महिला
  • स्तनपान करणाऱ्या महिला

या लोकांनी २४ तास उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

दीर्घकाळ किंवा वारंवार उपवास करण्याबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे. NIH मधील माहितीनुसार, नियमितपणे दीर्घकाळ उपवास करणाऱ्या काही लोकांमध्ये गॉलस्टोन म्हणजे पित्ताशयातील खडे होण्याचा धोका वाढू शकतो.

उपवास करताना पाणी पिणे विसरू नका

उपवास करताना हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, उपवासाच्या प्रकारानुसार काय प्यावे आणि किती प्यावे याचे नियम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या किंवा औषधे सुरू असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

२४ तासांचा उपवास संपल्यानंतर लगेच भरपूर जेवू नका

उपवास संपल्यानंतर अचानक खूप मोठे जेवण करण्याचा मोह होऊ शकतो. मात्र, सुरुवातीला हलका आणि सहज पचणारा आहार घेणे अधिक योग्य ठरू शकते.

उपवासानंतरच्या आहारासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

१. आधी पाणी घ्या– उपवासादरम्यान पाणी कमी झाले असेल तर शरीराला पुरेसे द्रव मिळणे महत्त्वाचे आहे.

२. एकदम भरपूर खाऊ नका- २४ तासांनंतर अचानक मोठ्या प्रमाणात अन्न घेतल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.

३. अन्न व्यवस्थित चावून खा- घाईघाईने खाण्याऐवजी सावकाश आणि व्यवस्थित चावून खा.

४. हलका, शिजवलेला आहार निवडा- उपवासानंतर सुरुवातीला साधा आणि सहज पचणारा आहार घेणे चांगले. अचानक खूप तेलकट, जड किंवा नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ खाणे टाळा.

मग २४ तास उपवास करावा की नाही?

फक्त वजन कमी करण्यासाठी २४ तास उपाशी राहणे आवश्यक नाही. काही लोकांसाठी इंटरमिटंट फास्टिंग हा आहाराचा एक पर्याय असू शकतो, तर काहींना तो अजिबात सोयीचा किंवा योग्य वाटणार नाही. मधुमेह, औषधोपचार, गर्भधारणा, स्तनपान किंवा ईटिंग डिसऑर्डरचा इतिहास असल्यास स्वतःहून दीर्घ उपवास सुरू करू नका.

वजन कमी करण्यासाठी कोणताही फास्टिंग प्लॅन किंवा डाएट सुरू करण्यापूर्वी हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. तुमची आरोग्यस्थिती, पोषणाची गरज आणि जीवनशैली लक्षात घेऊन तज्ज्ञ योग्य पर्याय सुचवू शकतात.