Fatigue Natural Remedies: दिवसभराच्या धावपळीनंतर थकवा जाणवला की लगेच काहीतरी गोड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं. पण प्रत्येक वेळी मिठाई, गोड पेय किंवा साखरयुक्त पदार्थ घेणे हा ऊर्जेसाठी योग्य पर्याय असेलच असे नाही. त्याऐवजी घरच्या घरी तयार होणारी काही साधी पेये दैनंदिन आहारात समाविष्ट करता येऊ शकतात. न्यूट्रिशनिस्टच्या मते, दिवसभर काम केल्यानंतर शरीराला द्रवपदार्थांसोबत काही पोषक घटकांचीही गरज असते. अशावेळी जास्त साखर असलेली पेये घेण्यापेक्षा साधे घरगुती पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया असे ३ पर्याय…

१. भेंडीचं पाणी — ऐकायला वेगळं, पण करून पाहा!

भेंडीपासून पेय? हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. मात्र भेंडीची पावडर पाण्यात मिसळून साधं पेय तयार करता येते. भेंडीची पावडर पाण्यात चांगली मिसळून ताजं पाणी प्यावं. सुरुवातीला चव किंवा पोत वेगळा वाटू शकतो, त्यामुळे कमी प्रमाणापासून सुरुवात करू शकता.

२. खजूर + काळे मनुके + पुदिना; गोडही आणि घरगुतीही

थकवा जाणवल्यावर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर खजूर आणि काळ्या मनुकांपासून तयार केलेलं पेय हा एक पर्याय ठरू शकतो. खजूर आणि काळे मनुके काही वेळ पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर त्याच पाण्यात ते मिक्स करा आणि त्यात थोडासा पुदिना घाला. खजूर आणि मनुकांमुळे पेयाला नैसर्गिक गोडवा मिळतो, त्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज नाही.

३. ताक — साधं पेय, पण उन्हाळ्यात भारी!

ताक हा भारतीय घरांमधील पारंपरिक आणि लोकप्रिय पर्याय आहे. मात्र ते लस्सीसारखं घट्ट न करता थोडं पातळ आणि सरसरीत ठेवणं चांगलं. त्यात पुदिना, भाजलेलं जिरे किंवा जिऱ्याची पूड आणि थोडं मीठ घालून चविष्ट ताक तयार करता येतं.

थकवा आला म्हणजे नेहमी साखरेची गरज असते का?

थकवा जाणवला की शरीराला लगेच साखर हवी आहे, असं समजणं योग्य नाही. अपुरी झोप, कमी पाणी पिणे, जेवणातील अंतर, जास्त काम किंवा शारीरिक हालचाल यामुळेही थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वारंवार किंवा कारण नसताना थकवा जाणवत असेल, तर केवळ गोड पेये घेण्याऐवजी त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.