How to Control High Blood Pressure Naturally : जीवनशैलीतील चुका, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा मारा; यामुळेच शरीराला अनेक आजार विळखा घालतात. त्यातील एक म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबाच्या आजाराने आजची तरुणाईही त्रस्त आहे. या आजाराची लक्षणे अनेकदा लगेच दिसून येत नाहीत आणि त्यामुळे हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडांना गंभीर नुकसान होऊ शकते.
अमेरिकन मेडिकल सेंटर मेयो क्लिनिकच्या मते, आपल्या शरीरात रक्त जेव्हा खूप जोराने वाहते तेव्हा धमन्यांवर जास्त दाब येतो आणि हा दाब बराच काळ कायम राहतो, त्या अवस्थेला उच्च रक्तदाब असे म्हणतात. तेव्हा हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते. या स्थितीमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. पण, काही जीवनशैलीतील छोटे बदल उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात.
हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांनी उच्च रक्तदाब रोखण्यासाठी जीवनशैलीतील तीन महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, जीवनशैलीतील छोटे बदल उच्च रक्तदाबाचा धोका कमी करू शकतात आणि या सवयी सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
उच्च रक्तदाब कमी करण्याचे सोपे उपाय
दररोज व्यायाम करा – डॉक्टर सुधीर कुमार यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने किमान ३० ते ४० मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. यामध्ये जलद चालणे, योगा, तुम्ही निवडलेला कोणताही व्यायाम समाविष्ट आहे. वॉल सीट आणि प्लँक्स असे व्यायामदेखील फायदेशीर आहेत.
योग्य अन्न खा – उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. डॉक्टर सुधीर कुमार यांनी मीठ, पॅकेज केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आणि गोड पेय आदींचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. याऐवजी तुमच्या आहारात अधिक फळे, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा, यामुळे रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यास मदत होईल.
पुरेशी झोप घ्या – ताण आणि झोपदेखील उच्च रक्तदाब कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मते चांगली झोप, सुधारित मानसिक आरोग्य रक्तदाब नियंत्रित ठेवतो. डॉक्टर सुधीर दररोज ७ ते ८ तास झोप घेण्याची शिफारस करतात आणि प्रत्येकाने त्यांच्या दैनंदिन जीवनात ध्यान आणि प्राणायामचा समावेश केला पाहिजे असेही म्हणतात.
