30 Minutes After Meal: बहुतेक लोक ताटात काय वाढले आहे याचे नियोजन करण्यात वेळ घालवतात, मात्र जेवण संपल्यानंतर काय करावे याकडे फार कमी लोकांचे लक्ष असते. हा दुर्लक्षित काळच शरीरातील साखरेचे प्रमाण, पचन आणि ऊर्जा कशी राहील हे ठरवतो. जेवणानंतर थोडा वेळ चालणे, चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा लगेच झोपणे यांसारख्या छोट्या सवयी शरीराच्या आत वेगळे संकेत देतात. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते किंवा स्थिरावू शकते, पचन सुधारू शकते किंवा मंदावू शकते.
डॉ. विजय कुमार यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. “बहुतेक लोक आपण काय खातो याकडे जास्त लक्ष देतात. पण खाल्ल्यानंतरच्या ३० ते ६० मिनिटांत तुम्ही काय करता हे तितकेच महत्त्वाचे असू शकते.”
जेवणानंतर शरीर कार्य कसं करतं?
जेवण संपले म्हणजे शरीराचे काम संपले असे नाही. उलट तिथूनच खरी प्रक्रिया सुरू होते. अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि ते रक्तप्रवाहात मिसळते. ही साखर नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडातून इन्सुलिन बाहेर पडते.
डॉ. कुमार यांच्या मते, “जेव्हा तुम्ही जेवणानंतर लगेच बसता किंवा झोपता, तेव्हा तुम्ही शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणता.” यामुळे रक्तातील साखर गरजेपेक्षा जास्त काळ वाढलेली राहते.
बसून राहणे विरुद्ध चालणे: एक छोटा बदल, मोठा परिणाम
जेवणानंतर अनेकजण मोबाइल बघत बसतात किंवा आरामासाठी झोपतात. पण हालचाल केल्यावर स्नायू थेट रक्तातून ग्लुकोज शोषून घेतात. यामुळे अतिरिक्त इन्सुलिनची गरज न पडता रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
डॉ. कुमार सांगतात की, “जेवणानंतर केवळ दहा मिनिटे चालल्याने स्नायू ग्लुकोज शोषून घेण्यास उत्तेजित होतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.” ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ (NIH) च्या २०२२च्या अभ्यासानेही याला दुजोरा दिला आहे.
झोपण्याची सवय का घातक आहे?
अनेकांना जेवल्यानंतर लगेच सोफ्यावर किंवा बेडवर पडण्याची सवय असते. पण पचनसंस्था या स्थितीसाठी तयार नसते. यामुळे ॲसिड रिफ्लुक्सचा (पित्त वर येणे) त्रास वाढू शकतो. अन्नाचे नीट पचन होण्यासाठी ताठ बसणे किंवा उभे राहणे कधीही चांगले, त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटत नाही.
ताणतणाव: पचनातील छुपा अडथळा
केवळ अन्नच नाही, तर तुमच्या मनाची स्थितीही पचनावर परिणाम करते. डॉ. कुमार यांच्या मते, तणावामुळे शरीरातील ‘कोर्टिसोल’ आणि ‘ॲड्रेनालाईन’ वाढते, त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगते. त्यामुळे जेवल्यानंतर काही मिनिटे संथ श्वसन केल्यास शरीर रिलॅक्स होते आणि पचन सुधारते.
पचनास हानी पोहोचवणाऱ्या सवयी:
- जेवणानंतर लगेच झोपणे.
- लगेच जड व्यायाम करणे.
- धूम्रपान करणे.
- एकाच वेळी जास्त प्रमाणात थंड पाणी पिणे.
नेमके काय करावे?
यासाठी काही सोपे बदल तज्ज्ञ सांगतात.
- “उभे राहा, थोडा वेळ चाला आणि दीर्घ श्वास घ्या.”
- जेवणानंतर १० मिनिटे संथ गतीने चाला.
- लोळत बसण्यापेक्षा ताठ बसा.
- काही मिनिटे शांत राहून दीर्घ श्वास घ्या.
तुमच्या जेवणाची सांगता शेवटच्या घासाने होत नाही, तर त्यानंतरच्या ३० मिनिटांनी होते. शरीर तुमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही, तर केवळ छोट्या आणि सातत्यपूर्ण मदतीची अपेक्षा करते.
